- स्टार ९५५
- स्वयंपाकघराचे बजेट वाढले : घरखर्च चालविण्याची कसरत
नागपूर : पेट्रोल, डिझेल, किराणा, खाद्यतेल, किराणा आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीने महागाई गरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. भाजीपाला, धान्य आणि डाळींच्या किमतीने गृहिणींचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट वाढले आहे. त्यातच पुढे सणासुदीच्या दिवसांत भाजीपाला आणि डाळींच्या किमतीत वाढ होण्याचे संकेत आहेत. वाढत्या किमतीत मसूर आणि अन्य स्वस्त डाळींनी भूक भागविली जात आहे. दरवाढीवर नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे.
सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य आणि गृहिणी त्रस्त आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शिवाय काहींचे उत्पन्न कमी झाल्याने घरखर्च कसा चालवायचा, याचे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना महामारीने सर्व जण चिंतातुर आहेत. सध्या पावसामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने किमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने भाज्यांची लागवड केली नाही. केवळ भाज्यांचे उत्पादन घेणारे शेतकरी भाज्यांची लागवड करीत आहेत. नवीन उत्पादन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आल्यानंतरच दर कमी होतील, अशी शक्यता राम महाजन यांनी व्यक्त केली.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा लावल्याने भाव कमी झाले होते. पण, आता ही मर्यादा हटविल्याने सर्वच डाळींचे भाव पुन्हा क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. सध्या उठाव नाही, पण पुढे सणांमध्ये भाव पुन्हा वाढण्याची शक्यता कळमन्यातील धान्य विक्रेते रमेश उमाठे यांनी व्यक्त केली.
डाळींचे भाव (प्रति किलो, दर्जानुसार)
तूर १०५-१२०
मूग ८०-९८
उडीद ९५-११०
मसूर ८०-९५
हरभरा ६०-७५
वाटाणा ७०-८०
...म्हणून डाळ महागली!
- चार दिवसांपूर्वी डाळींच्या साठवणुकीवरील निर्बंध केंद्र सरकारने हटविल्याने सर्व प्रकारच्या डाळींच्या किमतीत प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.
- तूर आणि चन्याला कमी भाव मिळाल्याने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कमी पेरणी केली. त्यामुळे उत्पादन कमी झाले. परिणामी, भाव वाढले.
- यंदा प्रारंभी खरीप हंगामात पावसाने दांडी मारल्याने डाळींची भाववाढ झाली.
...म्हणून भाजीपाला कडाडला!
नागपुरातील ठोक बाजारपेठांमध्ये नागपूरलगतचा परिसर आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक पावसामुळे कमी झाली आहे; शिवाय शेतातच माल खराब झाला आहे. सध्या शेतीचा हंगाम आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत. आणखी दीड महिना भाज्या जास्त भावात खरेदी कराव्या लागणार आहेत.
सर्वसामान्यांचे हाल :
बाजारात सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून महागाईने कळस गाठला आहे. महिन्याचा खर्च चालविण्याचे आव्हानच आहे. धान्य, डाळी, भाज्यांच्या किमतीत अतोनात वाढ झाली आहे. सरकारने भाववाढीवर नियंत्रण आणावे.
शाश्वती सगणे, गृहिणी.
कोरोना महामारीमुळे महिन्याचे उत्पन्न कमी झाल्याने घरखर्च चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कुटुंबाचे खर्च पूर्वीपेक्षा वाढल्याने हातात पैसा उरत नाही. त्यामुळे काटकसर करावी लागते. नेहमीच्या दरवाढीने चिंतित आहे.
नीलिमा मुळे, गृहिणी.
भाजीपाल्याचे भाव (प्रति किलो)
कोथिंबीर १००
हिरवी मिरची ४०
फूल कोबी ५०
ढेमस ६०
टोमॅटो ४०
कारले ५०
गवार शेंग ६०
दोडके ४०
लवकी ३०
वांगे ३०
पालक ५०