नागपूर : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.. चा जयघोष करीत टाळ-मृदंगाच्या सोबतीने वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. एसटीची लालपरी त्यांच्या सेवेत असून गेल्या पाच दिवसांत १,२२१ भाविक नागपूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. ज्येष्ठांसोबत अनेकांचे कुटुंबीयही सोबत आहेत. त्यात महिलांचाही उत्साह पाहण्याजोगा असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात.
आषाढी एकादशीचे वेध दरवर्षी जून महिन्यातच लागतात. त्यानंतर लाडक्या विठूरायाच्या चरणांवर माथा टेकविण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू होते. पंढरीला जाता यावे म्हणून अनेक जण वर्षभर काटकसर करून पै-पै गाठीला जोडतात. यंदा मात्र वारकऱ्यांना विठूरायाने आपल्या जवळ बोलवून घेताना त्यांना प्रवासासाठी पैशाची चिंता भासू नये, अशी खास व्यवस्था केली आहे. होय, एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलत देऊन प्रवासाच्या खर्चाचा भार कमी केला आहे. त्यामुळे यंदा ज्येष्ठ नागरिकांसोबतच महिला आणि कुटुंबातील मुलेही विठूरायाच्या दर्शनाला पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत. आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली असल्यामुळे प्रवाशांची लगबग आणि उत्साह पाहण्यासारखा आहे. नागपूर जिल्ह्यातील एसटीच्या अधिकाऱ्यांनी भाविकांसाठी खास व्यवस्था केली आहे. त्यानुसार, २२ जूनपासून एसटीच्या फेऱ्या पंढरपूरकडे जाऊ लागल्या आहेत. आतापर्यंत एसटी बसेसमधून २,११२ प्रवासी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. आणखी दोन तीन दिवसांत प्रवाशांची संख्या तीन हजारांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे.