कामठी : राजकीय कुरघोड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कामठी तालुक्यातील गुमथळा, वडोदा या जि.प. सर्कल, तर महालगाव आणि बीडगाव या पं.स. गणाकरिता पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे येथे काँग्रेस आणि भाजपा आधीच्याच उमेदवारांना संधी देते की, नवीन उमेदवारांना, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गत निवडणुकीत गुमथळा सर्कलमधून भाजपचे अनिल निधान यांनी काँग्रेसचे दिनेश ढोले यांचा १,३०४ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे १९ जुलैला होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपकडून अनिल निधान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसकडून तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ढोले व अनंता अबर वाघ यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या सर्कलमधून प्रहार सामाजिक संघटनेकडून रमेश पारधी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन एकता मंच व बहुजन समाज पार्टीकडून उमेदवार रिंगणात राहणार असल्याने सत्ताधारी पक्षाला विजयी पताका कायम ठेवताना निश्चितच घाम फुटणार आहे.
वडोदा सर्कलमध्ये काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे यांनी भाजपच्या अनिता चिकटे यांचा ३,५९७ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे काँग्रेस लेकुरवाळे यांना, तर भाजपा माजी सभापती अनिता चिकटे यांना पुन्हा रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. येथे प्रहारच्या वतीने सोनम छत्रपाल करडभाजणे, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीकडून उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे.
महालगाव पंचायत समिती गणात गतवेळी भाजपच्या शालू हटवार यांनी काँग्रेसच्या रिता ललित वैरागडे यांचा ७९४ मतांनी पराभव केला होता.
पोटनिवडणुकीत येथे भाजपाकडून शालू हटवार, तर काँग्रेसकडून कापसीच्या समीक्षा शेंद्रे, परसाड येथील सोनू कुथे, महालगाव येथून निर्मला इंगोले यांनी उमेदवारी मागितली आहे. यासोबतच या पंचायत समिती गणात प्रहार सामाजिक संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीकडून उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे दिसून येत आहे. बीडगाव पंचायत समिती गणात गतवेळी काँग्रेसचे आशिष मल्लेवार यांनी भाजपचे प्रदीप चकोले यांचा १,७८६ मतांनी पराभव करून विजय मिळविला होता. त्यामुळे पोटनिवडणुकीत मल्लेवार यांना संधी दिली जाते की, नवीन उमेदवार दिला जातो, याकडे नजरा लागल्या आहे. येथे टेमसना ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोहर कोरडे हेही लढण्यास इच्छुक आहेत. यासोबतच इतर राजकीय पक्षांचे उमेदवारही येथे मैदानात असतील.