नागपूर : सोनेगाव तलावाच्या १८.२ कोटी रुपयांच्या सौंदर्यीकरणाचे काम होत असताना तलावाला लागून असलेल्या वस्त्यांकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, असे येथील त्रस्त झालेल्या नागरिकांची मागणी आहे. या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी घराघरात शिरते. गटारी बुजल्या आहेत. सौंदर्यीकरणासोबत पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. १८.२ कोटी रुपयांच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले. ठेकेदाराची नियुक्ती झाली असून, वर्षभरात काम पूर्ण करायचे आहे. सोनेगाव तलावालगत ममता सोसायटी, शिवशक्ती सोसायटीमध्ये तलावाचे पाणी शिरते. पाण्यासोबत गटारीची घाणसुद्धा असते. या सोसायटीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. या सौंदर्यीकरणासोबत परिसरातील लोकांच्या समस्येकडे लक्ष दिल्यास लोकांना दरवर्षी होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळेल. ही समस्या सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) बनविण्यात यावा, अशी मागणी होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सौंदर्यीकरणाच्या कामासोबतच ही समस्यासुद्धा सुटेल अशी लोकांची अपेक्षा आहे. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्यास एकीकडे सौंदर्यीकरण व दुसरीकडे दयनीय स्थिती अशी परिस्थिती सोनेगाव परिसरात नजरेस पडेल.
सौंदर्यीकरणाच्या कामात नक्षत्र गार्डन, वॉकिंग ट्रॅक, दोन प्रवेशद्वार, पार्किंग झोन, बैठकीचा परिसर, हिरवळ, शौचालय आदींचा समावेश आहे.
- साथीचे आजार पसरण्याची शक्यता
पावसाळ्यात तलावाच्या पाण्यामुळे व गटारीच्या घाणीमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक या समस्येमुळे त्रस्त आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समस्या सोडवाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.