सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना यावरील प्रभावी औषधाच्या तुटवड्यामुळे कोरोनाचे संकट आणखीच गडद होत आहे. ‘रेमडेसिवीर’सारख्या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यावर पर्यायी उपाय म्हणून बहुसंख्य खासगी कोविड हॉस्पिटल प्लाझ्मा थेरपीकडे वळू लागले आहेत. परिणामी, दिवसाकाठी सुमारे १५ ते २० रुग्णांना ही थेरपी दिली जात असल्याची माहिती आहे.
कोरोनाचा वेग गेल्या काही दिवसांपासून मंदावला असला तरी रोज हजारावर रुग्णांची नोंद होत आहे. मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मागणी वाढली आहे. परिणामी, काही ठिकाणी चढ्या दराने याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मागणी व पुरवठा यावर लक्ष ठेवून आहे. नुकतेच नागपुरात येऊन गेलेले अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केवळ गरजू रुग्णांवरच करण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत अनेक खासगी कोविड हॉस्पिटल कोविडच्या उपचारात प्लाझ्मा थेरपीचा समावेश करू लागले आहेत. परिणामी, विविध रक्तगटांच्या कन्व्हेलेसेन्ट प्लाझ्माच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु प्लाझ्मा दात्यांची संख्या कमी असल्याने मागणीच्या तुलनेत प्लाझ्मा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचेही वास्तव आहे.
-काय आहे, ‘कन्व्हेलेसेन्ट प्लाझ्मा’कोरोनाच्या संसर्गानंतर आपल्या शरीरातील रोग-प्रतिकारक शक्ती या विषाणूच्या विरुद्ध अॅन्टिबॉडी तयार करते, त्यामुळे विषाणू नष्ट होतात आणि रुग्ण बरा होतो. या अॅन्टिबॉडी आणखी काही महिने आपल्या रक्त-प्लाझ्मामध्ये राहतात. आजारातून सावरलेल्या रुग्णांकडून गोळा केलेल्या या प्लाझ्माला ‘कन्व्हेलेसेन्ट प्लाझ्मा’म्हणतात जो कोविड रुग्णाला दिल्यास, या अॅन्टिबॉडीज रुग्णाच्या शरीरातून विषाणूचा नाश करतात व रुग्ण लवकर बरा होतो.
-आरबीडी प्लाझ्माच्या मागणीत वाढआरबीडी-अॅन्टिबॉडीचे जास्त प्रमाण असलेला प्लाझ्मा कोविड रुग्णाला दिल्यास अॅन्टिबॉडी ताबडतोब कोरोना विषाणूला निष्प्रभावी बनवतात. रुग्णातील रोगप्रतिकारक यंत्रणा स्वत:ची अॅन्टिबॉडी तयार करण्याआधीच रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. परिणामी, मागील काही दिवसांत आरबीडी-अॅन्टिबॉडीची चाचणी केलेल्या कन्व्हेलेसेन्ट प्लाझ्माची मागणी वाढली आहे. रक्तपेढीत रोज ५० आरबीडी प्लाझ्मा बॅगची मागणी होत आहे. परंतु प्लाझ्मा दाते नसल्याने १० ते १५ बॅग देणे शक्य होत आहे.-
डॉ. हरीश वरभे, संचालक, लाईफलाईन रक्तपेढी
-प्लाझ्मा थेरपी पर्याय ठरू शकतोफॅव्हिपिरॅव्हिर, टॉसीलिझूमॅब किंवा रेमडेसिवीर हे कोविड रुग्णांच्या वापरातील इंजेक्शन १०० टक्के प्रभावी नाही. प्रत्येक कोरोनाबाधित रुग्ण या औषधांमुळे बरा होतोच असेही नाही. यांचा तुटवडा पडल्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा पर्याय नक्कीच समोर आला आहे. परंतु यावरील मानवी चाचण्या अद्यापही सुरू आहेत. निष्कर्षापर्यंत कोणी पोहचले नाही.-डॉ. जय देशमुख, वरिष्ठ फिजिशियन