नागपूर : यंदा देशात कापसाचे पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरनी वाढले असले तरी पहिल्या तीन महिन्यांत कापसाची आवक मात्र २०.१२ टक्क्यांनी घटली आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूसविक्री थांबविली असल्याचे उद्याेजकांचे म्हणणे असले तरी, घटती आवक उत्पादन घटण्याचे संकेत देत आहे. या हंगामात देशात कापसाचे उत्पादन ३३९ ऐवजी ३०० लाख गाठींवर स्थिरावणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
देशात सन २०२१-२२ च्या तुलनेत सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात कापसाचे पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरनी वाढून ते १२५ लाख हेक्टर झाले. या हंगामात पंजाब व हरयाणामध्ये गुलाबी बाेंडअळीमुळे, तर सततचे ढगाळ वातावरण व अतिमुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्रात कपाशीचे किमान ४५ टक्के, गुजरात, तेलंगणा व आंध्र प्रदेश या प्रमुख व माेठ्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये किमान २३ टक्के नुकसान झाले. महाराष्ट्र व मध्य प्रदेशात उशिरा फलधारणा झाल्याने कापसाची वेचणी लांबणीवर गेली. त्यामुळे पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादनात घट हाेणार असल्याचे कृषिक्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे कापसाचे उत्पादन ३०० लाख गाठींच्या आसपास स्थिरावणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
‘सीएआय’चा अंदाज
सन २०२१-२२ मध्ये देशात ३६२ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) व्यक्त केला हाेता. वास्तवात, उत्पादन झाले ३०७.६० लाख गाठींचे. सन २०२२-२३ मध्ये ३७५ लाख गाठींचे उत्पादन हाेणार असल्याचे सीएआयने स्पष्ट केले हाेते. नंतर हा अंदाज ३६५ वरून ३४३ लाख गाठींवर आणि आता ३३९ लाख गाठींवर आला आहे.
तज्ज्ञांचा अंदाज
कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गाेविंद वैराळे यांच्या मते ३०० ते ३२० लाख, कापूस उत्पादक तथा जिनर अशाेक निलावार यांच्या मते ३३० ते ३४० लाख, काॅटन ॲडव्हायझरी बाेर्डचे माजी सदस्य तथा कापूस उत्पादक विजय निवल यांच्या मते ३२० लाख, प्रयाेगशील शेतकरी गणेश नानाेटे यांच्या मते ३२५ ते ३२५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असून, मागील हंगामाच्या तुलनेत १५ ते २० टक्के कमी उत्पादन हाेणार असल्याचे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुसूदन हरणे यांनी सांगितले.कापसाची राज्यनिहाय आवक (आकडे गाठींमध्ये)राज्य १ ऑक्टाे.- २२ ते १० जाने.- २३ - १ ऑक्टाे.- २१ ते १० जाने.- २२पंजाब - १,१८,५४९ - ३,९१,००० - (-२,७२,४५१)हरयाणा - ५,३५,३३५ - ७,२६,००० - (-१,९०,६६५)राजस्थान - १५,५०,६०० - १३,९६,००० - (१,५४,६००)गुजरात - २७,३०,००० - ३६,२१,००० - (-८,९१,०००)महाराष्ट्र - १२,९६,५०० - ३३,६६,००० - (-२०,६९,५००)मध्य प्रदेश - ६,५६,५०० - १०,९०,५०० - (-४,३४,०००)तेलंगणा - ५,८०,००० - १५,१२,५०० - (-९,३२,५००)आंध्र प्रदेश - ५,११,३०० - ७,२०,५०० - (-२,०९,२००)कर्नाटक - ६,७६,५०० - ११,४८,००० - (-४,७१,५००)तामिळनाडू - १,१२,५०० - ५१,९०० - (६०,६००)ओडिशा - ४०,९०० - ५१,९०० - (-११,०००)इतर राज्ये - ८,००० - ९०,००० - (-८२,०००)एकूण - ८८,१६,६८४ - १,४१,८४,२०० - (- ५३,६७,५१६)