लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांनी रोजगार मागणारे नव्हे तर नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणून रोजगार देणारे बनावे ही काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन ‘एलआयटी’तील माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडावेत व त्यांच्यात ‘स्टार्टअप’साठी ‘व्हिजन’ निर्माण व्हावे यासाठी ‘इन्क्युबेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी लोकसारंग हरदास हे विद्यार्थ्यांचे हित पाहता दीड कोटींचे आर्थिक सहकार्य करणार आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात अनोखा आदर्शच प्रस्थापित केला आहे.
अनेक विद्यार्थ्यांना ‘स्टार्टअप’ सुरू करण्याची इच्छा असते किंवा त्यांच्यात क्षमता असते. मात्र त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळत नाही व त्यामुळे त्यांच्या डोक्यातील संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा मिळावी यासाठी ‘एलआयटी’च्या माजी विद्यार्थी संघटना ‘लिटा’ने ‘इन्क्युबेशन सेंटर’मध्ये ‘स्टार्टअप कट्टा’ सुरू करण्याचे ठरविले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत यश प्राप्त करणाऱ्या उद्योजकांशी संवाद साधता येईल व मार्गदर्शन घेता येईल.
या कट्ट्याचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी एलआयटी संचालक डॉ. राजू मानकर, ‘लिटा’चे अध्यक्ष माधव लाभे, सचिव उत्कर्ष खोपकर, इन्क्युबेशन सेंटरचे प्रकल्प संचालक विनोद कालकोटवार, सह-संचालक सचिन पळसोकर, माजी अध्यक्ष अजय देशपांडे, मिली जुनेजा, चिन्मय गारवे, राजेश मालपानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन विद्यार्थ्यांना दिशा दाखविणे आवश्यक
या ‘इन्क्युबेशन सेंटर’मध्ये विविध पायाभूत सुविधा उभ्या करणे आवश्यक होते. या सुविधा जागतिक दर्जाच्या असाव्यात, असा माजी विद्यार्थ्यांचा आग्रह होता. विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे यासाठी महाविद्यालयातीलच माजी विद्यार्थी व अमेरिकेतील उद्योजक लोकसारंग हरदास यांनी तातडीने दीड कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविणे आवश्यक आहे व या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे निश्चितच भविष्य घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.