नागपूर : शहरातील तलावांबाबत प्रशासनाच्या घोषणांबाबत सामान्य नागरिकांनी विचार केल्यास सद्यस्थितीत या तलावांची स्थिती आणि प्रशासनाचे दावे यात बरेच अंतर असल्याचे लक्षात येते. शहरातील अंबाझरी तलावात प्रशासनाने सी प्लेन उतरविण्याची योजना आखली होती. परंतु लोकमतने या तलावाचे निरीक्षण केले असता या तलावाची बिकट अवस्था असल्याचे लक्षात आले.
नागपुरातील मधोमध असलेल्या तलावांमुळे शहराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. परंतु या तलावांकडे स्थानिक प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे, हा न समजण्यासारखा विषय आहे. शासनाच्या वतीने अनेकदा या तलावांची देखभाल आणि सौंदर्यीकरणाबाबत घोषणा करण्यात येतात. परंतु कोट्यवधी रुपयांच्या सौंदर्यीकरणाच्या घोषणेनंतरही आजही शहरातील तलावांची अवस्था बिकट असल्याची स्थिती आहे.
.........
उगवली आहेत झाडे
अंबाझरी तलावाबाबत अनेकदा लाखो रुपयांची योजना तयार होऊन त्याबाबत प्रशासनाने घोषणाही केल्या आहेत. परंतु आतापर्यंत या तलावाचे सौंदर्यीकरण होऊ शकले नाही. लोकमतच्या चमूने या परिसराची पाहणी केली असता तलावाच्या परिसरात दाट झाडे लागल्याचे दिसले. ज्या ठिकाणी प्रशासनाने सी प्लेन उतरविण्याची योजना आखली होती तेथे नावसुद्धा चालविल्यास मोठी बाब आहे.
लीज वाढविण्याचा झाला नाही फायदा
राज्य शासनाने ३० वर्षांसाठी महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनला अंबाझरी तलावाच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी सोपविली होती. सन २०१८ मध्ये महापालिकेने एमटीडीसीला हा भाग हस्तांतरित केला होता. त्यानंतर राज्य शासनाने लीज वाढवून ९९ वर्षे केली. लीज वाढवून मिळाल्यानंतर एमटीडीसीने येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी लाखो रुपयांची योजना आखली. तलावाचे सौंदर्यीकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. फवारा, लेझर शो सारखे आयोजन करण्याची योजना आखली. दरम्यान, राज्यात चार ठिकाणी सी प्लेन उतरविण्याची योजना तयार करण्यात आली. यात अंबाझरी तलावाचा समावेश करण्यात आला होता. परंतु या घोषणेचा काहीच फायदा झाला नाही.
............