लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन हे वनविभागाचे प्राधान्य असायला हवे पण पैसा कमाविण्याच्या नादात उद्दिष्टच विसरल्याचे दिसते आहे. हीच अवस्था सध्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात बघायला मिळत आहे. हे उद्यान सध्या प्रेमीयुगुलांसाठी नंदनवन ठरले आहे. १० रुपयात प्रवेश घेतल्यावर दिवसभर जोडप्यांचा हैदोस चाललेला असतो. त्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासाचे तीनतेरा वाजले आहेत. यावर ना वनविभागाचे नियंत्रण राहिले ना संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे. ७५० हेक्टरमध्ये पसरलेले अंबाझरी जैवविविधता उद्यान हे राखीव वनक्षेत्राचा भाग आहे.
१५० च्यावर प्रजातींच्या पक्ष्यांसाठी हे नंदनवन आहे, शिवाय काही प्राण्यांचे वास्तव्यही यामध्ये आहे. पक्षी निरीक्षक व अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे नागरिकांचा अनावश्यक हैदोस होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र पर्यटन व पैसा कमाविण्याच्या नादात सर्रासपणे नियमांची पायमल्ली केली जात आहे. सुरुवातीला माॅर्निंग वाॅकर्स आणि सायकल ट्रॅकर्ससाठी उद्यान माेकळे करण्यात आले. इथपर्यंत ठीक असताना १० रुपये शुल्क आकारून सामान्य नागरिकांसाठीही ते माेकळे करण्यात आले. मात्र नागरिकांपेक्षा प्रेमीयुगुलांसाठीच माेकळे रान मिळाल्याचे दिसून येत आहे.
जी गर्दी सेमिनरी हिल्स, जापानी उद्यान किंवा बालाेद्यानाकडे व्हायची ती आता अंबाझरी जैवविविधता उद्यानात हाेऊ लागली आहे. नियंत्रणासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली पण त्यांनाही पैशाशिवाय काही दिसत नाही. सुरुवातीला हिंगणा एमआयडीसीकडून प्रवेश सुरू हाेता पण आता वाडी आणि पांढराबाेडी भागातूनही प्रवेश सुरू झाला. केवळ १० रुपये देऊन प्रवेश केला की उद्यानात दिवसभर माेकळे रान असते. झाडाझुडपात त्यांचे अश्लील चाळे चाललेले असतात. वनात दारूच्या बाॅटल्ससह अनेक आक्षेपार्ह वस्तू पडलेल्या आढळतात. सामान्य नागरिकांचे फिरणेही मुश्कील झाले आहे. या हैदाेसामुळे पक्ष्यांचा अधिवास धाेक्यात आला आहे.
राजकीय हस्तक्षेप कारणीभूत
संयुक्त वनव्यवस्थापन समितीमध्ये वनाबाबत कुणीही जाणकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा भर पर्यटन व पैशावर दिसताे. त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धनाकडे दुर्लक्ष हाेत आहे. पक्षी अधिवास संवर्धनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. राजकीय हस्तक्षेप वाढल्याने उद्यानामध्ये चाललेला सावळागाेंधळ वनविभागाच्याही नियंत्रणाबाहेर गेल्याचा आराेप पक्षी निरीक्षकांकडून केला जात आहे.