नागपूर : पावसाचा जाेर जसजसा वाढताे, तशी अंबाझरी ओव्हरफ्लाे पाॅइंटच्या खालच्या आठ-दहा वस्त्यांमधील नागरिकांची पुन्हा धडधड वाढायला लागली आहे. अंबाझरी ओव्हरफ्लाेची मर्यादा ३१७ मिटरवर आहे आणि बुधवार, गुरुवारी जलस्तर ३१६ मिटरवर पाेहचला हाेता. ओव्हरफ्लाे झाला तर पाणी वाहून जाण्याला मार्गही दिसत नाही, कारण खाली पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून येथील नागरिकांना जीव मुठीत घेवून जगावे लागते आहे.
अंबाझरी ओव्हरफ्लाे पाॅइंटच्या खाली अंबाझरी ले-आउट, डागा ले-आउट, वर्मा ले-आउट, कार्पाेरेशन काॅलनी, गांधीनगर, शंकरनगर ते रामदासपेठ व सीताबर्डीपर्यंतच्या नागरिकांनी २३ सप्टेंबर २०२३ राेजी पुराचा भयावह अनुभव घेतला आहे. अंबाझरी तलावाची भरती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून नाही. या बंधाऱ्यात वाडी, वडधामना, हिंगणा येथून येणारे पाणीही जमा हाेते. त्यामुळे दरराेज लाखाे लीटर पाण्याचा भरणा बंधाऱ्यात हाेताे. सध्या जलस्तराची स्थिती धाेक्याच्या स्तरापर्यंत पाेहचली आहे. एक जाेरदार पाऊस झाला तर ‘मिटरभर’ पातळी भरायला ‘मिनिटभर’ वेळ लागणार नाही, अशी भीती नागरिकांना आहे.
अशावेळी येणाऱ्या भीषण परिस्थितीला सांभाळण्यास महापालिका प्रशासनाने काेणतीही उपाययाेजना केली नसल्याची टीका नागरिकांनी केली आहे. ओव्हरफ्लाे पाॅइंटच्या खालच्या पूलाचे काम ऐन पावसाळ्यापूर्वी सुरू केले. आता पाण्याच्या प्रवाहाला त्या कामाचाही अडथळा हाेणार आहे. स्वामी विवेकानंद स्मारकाचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे व आपल्या चुकांवर पांघरून घालण्यात सर्वच यंत्रणा सरसावल्या आहेत. मात्र २३ सप्टेंबरच्या घटनेतून प्रशासनाने काेणताच धडा घेतला नसल्याने ताे कटू अनुभव पुन्हा येण्याची नागरिकांची भीती कायम आहे.
आता एलएडी जवळ नाल्याची भिंत खचलीकाही दिवसांपूर्वी शंकरनगर भागातून नाग नाल्याची सुरक्षा भिंत खचली हाेती व ती दुरुस्तीचे काम मनपातर्फे हाेत आहे. अशाच बुधवारी रात्री एनएडी महाविद्यालयाजवळूनही नाल्याची भिंत खचली. यानंतरही नाल्याची भिंत कुठून खचेल सांगता येत नाही. वास्तविक नालेसफाई व नाला दुरुस्तीचे काम तज्ज्ञ व्यक्तिद्वारे करणे आवश्यक असते. मात्र मनपाद्वारे कंत्राटदाराच्या भरवशावर काम केले जाते व जेसीबी चालक वाट्टेल त्या पद्धतीने माती काढून सुरक्षा भिंत कमजाेर करतात, असा आराेप शंकरनगर येथील रहिवासी डाॅ. अर्चना देशपांडे यांनी केला.
टाकीतून चमच्याने पाणी काढण्याचा प्रकारस्थानिक नागरिकांनी धाेक्याची तक्रार केली असता मनपाच्या मुख्य अभियंतांनी अंबाझरी तलावातून दाेन हायड्राेलिक पंपाद्वारे पाणी काढण्यात येत असल्याचे उत्तर दिले. अंबाझरी तलावात हा प्रकार म्हणजे वाडी, वडधामना, हिंगणा या भागातूनही प्रवाह येत असताना हा प्रकार म्हणजे टाकीतून चमच्याने पाणी काढण्यासारखा असल्याची टीका स्थानिक रहिवासी निवृत्त अधिक्षक अभियंता यशवंत खाेरगडे यांनी केली.
ड्रेनेज चेंबर बुजलेलेशंकरनगर भागात प्रत्यक्ष पाहणी केली असता पाणी वाहून नेणारे बहुतेक ड्रेनेज चेंबर बुजलेले आढळले. काही ड्रेनेजला पाणी येण्याचा मार्ग आहे, पाणी निघण्यासाठी मार्गच नाही. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर, लाेकांच्या घरात शिरत असल्याचे डाॅ. अर्चना देशपांडे यांनी सांगितले.