नागपूर : बुधवारी रात्रीपासून गुरूवारी सकाळपर्यंत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवली. नागपूरलगतच्या बेसा भागात एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला. हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या पुरात अडकलेल्या तीन मुलांसह १० जणांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ( एमडीआरएफ)जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
उमरेड रोड कळमना येथे हरडे फार्म हाऊस पूर्णपणे पाण्यामध्ये होते. येथे अडकलेल्या एका कुटुंबातील चौघांना सुखरुप बहेर काढण्यात आले. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.नागपूरच्या नरेंद्रनगर पुलाखाली दोन ट्रक पाण्यात अडकले. नागपूर विमातळाच्या प्रवेशदारावर भयानक चित्र आहे. विमानतळावर प्रवेश करणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.
बेसा भागात शिवकृपा नगरमध्ये राहणारे प्रकाश बर्वे ( ४२) बेसा नाल्यात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. हिंगण्यात हनुमान नगरमध्ये वेणा नदीचे पाणी शिरल्याने १० जण अडकले होते. त्यांच्यासह तीन मुलांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचवले. किरमती भरकस गावात सुमारे ५० ते ६० झोपड्या पाण्याने वेढल्या होत्या. उमरेड रोड कळमना येथे हरडे फार्म हाऊस पूर्णपणे पाण्यामध्ये होते त्यामध्ये एका कुटुंबातील चौघेजण अडकले होते. यात विनय धवनगये(४२) पत्नी नालिना(३२ )मुलगी पूर्वी(११) निस्टा(९) आणी एक डॉगी आदींचा समावेश होता. या सर्वांना सुखरूप पणे रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पहाटेपासूनच नागरिकांच्या तक्ररी येऊ लागल्या होत्या.याचे गांभीर्य लक्षात घेता महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी काढण्याचे काम सुरू आहे. वस्त्याच नाही तर शहरातील अनेक अपार्टमेंटमध्येही पाणी साचले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हे पाहता काही शाळांना सकाळी सुटी देण्यात आली.