लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त यंदा ड्रॅगन पॅलेस परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तूप डायनामिक लायटिंगने प्रकाशमय होणार आहे. या स्तूपावर विविध रंगांच्या तब्बल १८ दशलक्ष डायनामिक लाईट लावण्यात येतील. या लायटिंगच्या माध्यमातून स्तूपावर पंचशील ध्वजाची प्रतिकृती साकारली जाणार आहे. त्यामुळे याावेळी ड्रॅगन पॅलेस परिसरात बाबासाहेबांना अनोखी मानवंदना अर्पण करण्यात येईल.
ड्रॅगन पॅलेस परिसरातील कर्मयोगी दादासाहेब कुंभारे परिसरातील १० एकर जागेत मनमोहक व भव्यदिव्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्राची निर्मिती अत्यंत आधुनिक तंत्र वापरून करण्यात आली आहे. या भव्य-दिव्य स्तूपामध्ये असलेले परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजर्षी थाटातील आकर्षक पूर्णाकृती शिल्प उभारण्यात आले आहे. या स्तूपाचे वैशिष्ट्य असे आहे की, अर्धागोलाकार
स्टील स्ट्रक्चर डिझाईनची उंची ८० मीटर असून त्याच्या मध्यभागी कोणताही आधार दिलेला नाही. यात वापरण्यात आलेल्या स्टील अँगल व चॅनलचे वजन सरासरी ५० मॅट्रिक टन एवढे आहे. यावर लावण्यात आलेल्या लक्षवेधी एलेकोप्लायशिटस् तायवान येथून मागविण्यात आले आहे. जर्मन टेक्नाॅलाॅजीचे आयात केलेले विन्डोज पॅनलमध्ये ब्ल्यू टिनटेड ग्लास बसविण्यात आले असून हे अधिकच मनमोहक व त्याच्या सौंदर्यात भर घालत आहेत. याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तूपावर मध्य भारतातील एकमेव डायनाामिक लायटिंग सिस्टिम पहिल्यांदाच बसवली जात आहे. या लायटिंगमुळे संपूर्ण परिसर लक्ष-लक्ष विविध रंगांच्या प्रकाशाने उजळून निघेल. यामुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या नावलौकिकातही भरक पडेल, असा विश्वास टेम्पलच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला.
उद्या लोकार्पण
या अनोख्या डायनामिक लायटिंगचे लोकार्पण उद्या २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनी लोकांना प्रवेश बंद राहणार असल्याने लोक भेट देऊ शकणार नाहीत. हा लोकार्पण सोहळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडेल.