नागपूर : आता माघार नाहीच. लढेंगे-जितेंगे... असा नारा देत अंबाझरी येथील डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाची संपूर्ण २० एकर जागा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा एल्गार अंबाझरी येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी केला.
अंबाझरी येथील डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ व त्याच जागेवर स्मारकाच्या निर्मितीच्या मागणीसाठी डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर (अंबाझरी) बचाव कृती समिती अंतर्गत महिला व प्रबुद्ध नागरिकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. शनिवारी या आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. किशोर गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रा. प्रेमकुमार बोके, ओबीसी नेत्या यामिनी चौधरी, डाॅ. सरोज आगलावे, सरोज डांगे, डाॅ. धनराज डहाट, सुधीर वासे, राहुल परूळकर, जर्नादन मुन, अब्दुल पाशा, डाॅ. अशोक उरकुडे, राजेश गजघाटे, डाॅ. सरोज डांगे, तक्षशीला वाघघरे, छाया खोब्रागडे, पुष्पा बौद्ध, उषा बौद्ध, उज्वला गणवीर, ज्योती आवळे, सुगंधा शेंडे व्यासपीठावर होते.
याप्रसंगी प्रा. बोके म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उद्ध्वस्त करणे चुकीचे आहे. याविरोधात लढलेच पाहिजे. संचालन बाळू घरडे यांनी केले.
- संभाजी ब्रिगेडचाही पाठिंबा
यावेळी प्रा. प्रेमकुमार बोके यांनी संभाजी ब्रिगेडचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. आंबेडकर स्मारक वाचविणे म्हणजे संविधान वाचविणे होय. त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.