लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अॅण्ड लिटरेचरतर्फे यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अॅण्ड लिटरेचरचे अध्यक्ष दादाकांत धनविजय यांनी शनिवारी पत्रपरिषदेत यंदाच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. करंजा येथील प्रकाश जंजाळ यांच्या ‘आंबेडकरी क्रांतिनायक : बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे या पुस्तकासाठी वसंत मून वैचारिक - संशोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबतच सोलापूरचे योगिराज वाघमारे यांच्या ‘गहिवर’ या कादंबरीला बाबुराव बागुल कादंबरी पुरस्कार, गोवा येथील दादू मांद्रेकर यांच्या ‘ओंजळ लाव्हाची’ या कवितासंग्रहासाठी नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार, पुण्याचे नामदेव भोसले यांच्या ‘ये हाल’ या नाट्यकृतीसाठी अश्वघोष नाट्य पुरस्कार, उस्मानाबादचे जयराज खुणे यांच्या ‘स्वर-संगर’ या आत्मकथनाला दया पवार आत्मकथन पुरस्कार तर जबलपूरचे असंघ घोषण यांच्या ‘समय को इतिहास लिखने दो’ या पुस्तकासाठी भगवान दास हिंदी साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता हिंदी मोरभवन येथील मधुरम सभागृहात हे पुरस्कार वितरित करण्यात येतील. पत्रपरिषदेला डॉ. मच्छिंद्र चोरमारे, राजन वाघमारे, महेंद्र गायकवाड, डॉ. सविता कांबळे उपस्थित होते.