आनंद डेकाटे
नागपूर : आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित सेनानी, माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभूर्णे (वय ९१) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या वैशालीनगर येथील घरून निघेल. वैशालीनगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यामागे दोन मुले व तीन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे.
हरिदास टेंभूर्णे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतच चळवळीतील कार्याला सुरुवात केली. १९५६ मध्ये पार पडलेल्या नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. बाबासाहेबांच्या हस्ते त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. १९५६ मध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. ती शपथ त्यांनी शेवटपर्यंत पाळली. शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भूमिहीनांचा सत्याग्रहासह विविध काळात अनेक आंदोलने झाली. प्रत्येक आंदोलनात त्यांना सक्रिय सहभाग राहिला. टेंभूर्णे यांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांचे हे कार्य पाहून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दलित मित्र पुरस्काराने आणि ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.