भंते संघसेना यांच्या हस्ते हस्तांतरणनागपूर : देशाचे मुकुट असलेल्या जम्मू-काश्मीरमधील लडाखमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. हा पुतळा नागपुरातून लडाखमध्ये नेण्यात येत आहे. त्याचे हस्तांतरण भंते संघसेना यांच्या हस्ते करण्यात आले. लडाखमध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश यामागे आहे, अशी माहिती अमन कांबळे यांनी दिली. प्राचीन काळापासून बौद्धकालीन परिसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेह-लडाखमध्ये पहिल्यांदाच २३ ते २५ जुलैदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. त्याच वेळी तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर स्थापित केले जाणार असून, त्याचा कोनशिला समारंभ होणार आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेबांचा पुतळा लडाखमध्ये उभारला जात आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे हा पुतळा नागपुरात तयार करण्यात आला आहे. सनदी अधिकारी असलेले डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोंचाना व्हनिच (थायलंड) यांनी हा पुतळा उभारणीसाठी आर्थिक सहकार्य दिले आहे. या पुतळ्याचे हस्तांतरण अलीकडेच नागपुरात करण्यात आले. त्यावेळी उपस्थित लडाखचे भंते संघसेना यांनी डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते असल्याचे मत मांडले. पण आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचा सन्मान लडाखमध्ये झाला नव्हता. त्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा आहे. पुतळ्याचे प्रतिकात्मक दान भंते संघसेना यांना करण्यात आले. आता १० जुलैला हा पुतळा येथून लडाखला रवाना होणार आहे. २३ जुलैला आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यानच त्याचे अनावरण होईल. डॉ. प्रदीप आगलावे, डॉ बालचंद्र खांडेकर, धर्मेश फुसाटे, पी. एस. खोब्रागडे, अमन कांबळे यांनी यावेळी विचार व्यक्त केले. संजय मेश्राम, जोहर कांबले, श्रीराम कांबळे यांच्यासह आदी मान्यवर तसेच नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
लडाखमध्ये आंबेडकरांचा पहिला पुतळा
By admin | Published: June 29, 2016 2:57 AM