जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी उपराजधानीत दहशत पसरविलेला कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारसह टोळीतील पाच साथीदारांना नागपूर कारागृहातूनही तडीपार करण्यात आले आहे. सर्वांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलविण्यात आले आहे. काही दिवसापासून कैद्यांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धामुळे आणि त्यातून होणाऱ्या मारहाणीमुळे कारागृह प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
गुन्हे शाखेने १२ ऑक्टोबर २०१९ रोजी आंबेकर टोळीविरुद्ध गुजरातच्या व्यापाऱ्याकडून हप्ता वसुली व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आंबेकर टोळीविरुद्ध अपहरण, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, फसवणूक, हप्ता वसुली, जमिनीचा ताबा घेण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. आंबेकर, त्याचा भाचा नीलेश केदार, सराफा व्यापारी राजा अरमरकर, गुजरातच्या तीन हवाला व्यावसायिकासह एक डझनपेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती. राजा अरमरकर, मुंबईतील जुही नावाची महिला आणि तीन हवाला व्यापारी जामिनावर सुटले आहेत. परंतु आंबेकरसह सहा आरोपी नागपूर कारागृहात आहेत. एकमेकांशी वाद करून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी आंबेकर ओळखला जातो. काही दिवसापासून नागपूर कारागृहात कैद्यांमुळे मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. कुख्यात रोशन शेखवर हल्ल्यासह अनेक घटना घडल्या. कारागृह प्रशासनाने तपास केला असता, आंबेकर टोळीचा यात हात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या साथीदारांना दुसऱ्या कारागृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कारागृहात कोणताही गुन्हेगार किंवा व्यक्तीला न्यायालयाच्या निर्देशानुसार ठेवण्यात येते. आंबेकर टोळीला मकोकाच्या विशेष न्यायालयाच्या निर्देशावरून ठेवण्यात आले होते. कारागृह प्रशासनाने मकोकाच्या विशेष न्यायालयाला आंबेकर टोळीला हलविण्याची परवानगी मागितली होती. नागपूर कारागृहातील बहुतांश कैदी आंबेकरच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे नागपूर कारागृहात त्याचा दबदबा होता. कारागृह प्रशासनाच्या कारवाईमुळे आंबेकर टोळीत खळबळ उडाली आहे. आंबेकर टोळीने आपल्या गृह जिल्ह्याच्या जवळ असलेल्या कारागृहात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मकोकाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी आंबेकर टोळीला दुसऱ्या कारागृहात हलविण्याची परवानगी दिली. या निर्णयावर बुधवारपासून कारागृह प्रशासनाने अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. आंबेकरला नाशिक कारागृहात तर त्याचा भाचा नीलेश केदारला अकोला कारागृहात, नाशिकच्या रमेश लोणे पाटीलला अमरावती कारागृहात, मुंबईच्या जगन जगदानेला नागपूर कारागृहात तर अकोल्याच्या कृष्णा थोटांगेला भंडारा कारागृहात हलविण्यात आले आहे.
...........
४० पेक्षा अधिक गुन्ह्यात समावेश
आंबेकर टोळीविरुद्ध आतापर्यंत ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. आंबेकरची एवढी दहशत आहे की यूट्यूबवर अपलोड व्हिडीओ दाखवून तो पीडितांना धमकी देत होता. तो आपला धाक दाखविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत होता. अनेक राजकीय नेते आंबेकरशी जुळलेले होते. आंबेकरने गुन्हेगारी जगतात फूटपाथपासून सुरू केलेला प्रवास आलिशान बंगल्यापर्यंत पोहोचला होता. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याचा बंगला जमीनदोस्त करून त्याचे अस्तित्व संपविले आहे.
...........