नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) काही खासगी अॅम्ब्युलन्सचालक व सुरक्षा रक्षकांनी रुग्णांना जादा भावाने अॅम्ब्युलन्ससेवा देण्याचा गोरखधंदा सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी हा प्रकार समोर येताच रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘अॅम्ब्युलन्स’ ही सेवा आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर देणे बंधनकारक आहे, मात्र मेयो रुग्णालयाच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या अनेक अॅम्ब्युलन्स चालकांनी त्याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआमपणे लूट चालविली आहे. यात काही रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांची मदत घेऊन सेवेच्या नावावर अॅम्ब्युलन्सचा धंदा बहरला आहे. अमर्याद कमाईमुळे अनेकजण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. पूर्वी एक-दोन दिसणाऱ्या अॅम्ब्युलन्स आता १०-१५ दिसून येत आहेत. रुग्णाला मेयोतून घरी घेऊन जाण्याकरिता, इतर इस्पितळात नेण्याकरिता किंवा रुग्णाचा मृत्यू होताच माफक दरात घेऊन जाण्याच्या नावाखाली काही चालक मनमानीपणे पैशाची वसुली करीत आहे. या संदर्भाची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने सोमवारी घेतली. प्रशासनाने रुग्णालय परिसरात उभ्या राहणाऱ्या खासगी अॅम्ब्युलन्सला हटविण्यासाठी पोलीस विभागाला पत्र दिले. लवकरच या संदर्भात पोलीस उपआयुक्तांसोबतही बैठक होण्याची माहिती आहे. रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांनी रुग्णालयाच्या मेस्को सुरक्षा एजन्सीच्या मुख्य अधिकाऱ्यांना बोलवून समजही दिल्याचे कळते.(प्रतिनिधी) रुग्णालय परिसरात अवैधपणे उभ्या राहणाऱ्या खासगी अॅम्ब्युलन्सला हटविण्यासाठी पोलीस विभागाला पत्र दिले आहे. रुग्णाला जादा भावाने अॅम्ब्युलन्स सेवा देण्याचा प्रकार सुरू असेल तर त्याची चौकशीही केली जाईल. -डॉ. प्रदीप दीक्षित, प्रभारी अधिष्ठाता, मेयो
अॅम्ब्युलन्सचा गोरखधंदा
By admin | Published: September 20, 2016 2:20 AM