नागपूर : ॲम्बुलन्समधून मृतदेह घेऊन जाणाऱ्या चालकाने गुन्हेगार मुलाला टिप दिली आणि त्याने मृताच्या घरीच घरफोडी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अडकला व त्याच्या कबुलीजबाबातून ही धक्कादायक बाब समोर आली. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अश्वजित वानखेडे (४८) व रितेश वानखेडे (१९, पंचनल चौक, रामबाग) अशी आरोपी बापबेट्यांची नावे आहेत. अश्वजित हा ॲम्बुलन्सचालक असून रितेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. सोमवार क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या कल्पना हरिश्चंद्र घोडे यांच्या पतीचे २० ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी मूळ गावी बैतुल येथे पतीचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पतीचा मृतदेह घेऊन त्या वानखेडेच्या रुग्णवाहिकेतून बैतूलकडे रवाना झाल्या.
कल्पनाच्या घरी कोणी नसल्याची माहिती वानखेडेला होती. त्याने रितेशला त्यांच्याकडे घरफोडी करण्याची टिप दिली. रितेश त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांसह तेथे आला. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्याने सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख ४० हजार असा एकूण १.९५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. सक्करदरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ते फुटेज तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्सच्या आधारे रितेश अश्वजित वानखेडे (१९, रामबाग, पाचनल चौक) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने दोन अल्पवयीन साथीदारांसोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच टिप वडिलांनीच दिल्याचे सांगितल्यावर पोलिसांनादेखील धक्का बसला. पोलिसांनी अश्वजितलादेखील अटक केली आहे.
'ती' दुचाकीदेखील चोरीचीच
पोलिसांनी रितेशच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाइल व दुचाकी असा १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे रितेशने घरफोडीदरम्यान वापरलेली दुचाकीदेखील इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले.