सोलो रायडर गटात मिळविले यश : ११ दिवस २१ तास व ११ मिनिटांमध्ये शर्यत केली पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरचे जिगरबाज सायकल रेसर डॉ. अमित समर्थ यांनी रेस अक्रॉस अमेरिका (राम) पहिल्या प्रयत्नात पूर्ण करीत शहरासह देशाचा मान उंचावला आहे. जगातील सर्वांत कठीण मानली जाणारी रेस पूर्ण करण्यासाठी डॉ. समर्थ यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले, पण त्यांनी न डगमगता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ११ दिवस २१ तास व ११ मिनिटांमध्ये शर्यत पूर्ण करीत स्वप्न साकार केले. डॉ. समर्थ यांनी हा पराक्रम सोलो रायडर गटात केला. यांच्या व्यतिरिक्त नासिकचे श्रीनिवास गोकुलनाथ यांना रेस अक्रॉस अमेरिका ही शर्यत पूर्ण करण्यात यश आले. त्यांनीही सोलो रायडर गटात ही शर्यत ११ दिवस १८ तास व ४५ मिनिट वेळेत पूर्ण केली. या स्पर्धेत सहभागी होण्याची गोकुलनाथ यांची ही दुसरी वेळ होती. डॉ. समर्थ यांनी रेस अक्रॉस अमेरिका या शर्यतीत यश मिळवण्यासाठी कसून मेहनत घेतली होती. त्या निमित्ताने त्यांनी विविध शर्यतींमध्ये सहभाग नोंदवत शारीरिक व मानसिक कणखरता मिळवली. गत डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलियातील बुसेलटोन येथे त्यांनी ट्रायथ्लॉन पूर्ण करीत फुल आयर्न मॅन होण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारे ते मध्य भारतातील पहिले सायकल रेसर ठरले होते. ट्रॉयथ्लॉन पूर्ण करताना त्यांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले होते, पण याच कारणामुळे त्यांना रेस अक्रॉस अमेरिकेसाठी कणखरता मिळवता आली. ३६ वर्षीय डॉ. समर्थ यांनी अमेरिकेतील हॉपकिन्स विद्यापीठाच्या जनस्वास्थ्यमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी निर्धारित वेळेच्या दोन तासांपूर्वी शर्यत पूर्ण केली. ब्रेवेट््स व डेक्कन क्लिफेंगरमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला होता. वर्षभरापूर्वी सहा वेळा राम विजेता सिना होगनने डॉ. समर्थ यांना या खडतर स्पर्धेत त्यांच्या क्रू (दल) मध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. त्यावेळी त्यांना राम काय आहे, हे कळले. १२ दिवसांच्या कालावधीत त्यांना या शर्यतीसाठी स्टॅमिना, स्ट्रेंथ याची किती गरज आहे, याची कल्पना आली. त्याचसोबत इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.(क्रिडा प्रतिनिधी)
अमित समर्थने पूर्ण केली रेस अक्रॉस अमेरिका
By admin | Published: June 26, 2017 1:54 AM