- कमलेश वानखेडेनागपूर - विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वत: घेणार आहेत. ५ मार्च रोजी अकोला येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून तीत नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला व बुलढाणा-वाशिम या सहा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या मतदारसंघातील कोअर कमिटीचे ३५ व निवडणूक व्यवस्थापन समितीचे ३६ असे एकूण ७१ सदस्य उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नागपूर मंडळाची आढावा बैठक नागपुरात आटोपली. आता अमीत शहा यांच्या उपस्थितीत अमरावती व अकोला मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर जळगाव येथे दुपारी २ वाजता आयोजित युवक महासंमेलन व सायंकाळी ६ वाजता संभाजीनगगर येथे आयोजित जाहीर सभेत अमीत शहा सहभागी होणार आहेत.
४ मार्च रोजी नागपुरात ‘नमो युवा महासंमेलन’- ४ मार्च रोजी नागपुरातील रवीनगर मैदानावर ‘नमो युवा महासंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यात एक लाख युवक सहभागी होतील. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजप नेते उपस्थित राहतील. विकसित भारताच्या संकल्पनेबद्दल युवकांना काय वाटते, याबाबत युवकांकडून संकल्प पत्र भरून घेतले जाईल व युवकांचे मत केंद्रीय भाजपला पाठविले जाईल. याशिवाय युवकांना मनो ॲप च्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
६ मार्च रोजी ‘नारी शक्ती वंदन’- पक्षातर्फे ६ मार्च रोजी ‘नारी शक्ती वंदन’ हे महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिप्कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होतील. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ५ हजार मिहला एलईडी स्क्रीनवर मोदींना एैकतील.