नागपूर : कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर पाच-सहा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आज, शुक्रवार वेळ मागितली होती. मात्र, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही भेट आता सोमवार किंवा मंगळवारी होणार असल्याची माहिती शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन परिसरात प्रसामाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी, कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीबाबत बोलताना राम शिंदेंचं नाव घेऊन, रोहित पवारांना डावललं.
सध्या कांदा निर्यातबंदी, इथेनॉलचा प्रश्न राज्यात गाजत आहे. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात केंद्र सरकारशी बोलून यावर उपाय काढण्यासंदर्भात राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या मुद्द्यांवर केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसेच इथेनॉलसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलल्याचे स्वत: अजित पवार म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता ही भेट सोमवार वा मंगळवारी होणार असल्याचे अजित पवार म्हणाले. यावेळी पीएचडी वादावर बोलताना ते म्हणाले,‘मी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या बाजूने हा विषय संपलेला आहे.’
एमआयडीसी राम शिंदेंच्या सूचनेप्रमाणेच
कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदे हे बारीक लक्ष घालून आहेत. तिथे एमआयडीसी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तिथे राम शिंदे यांच्या सूचनेप्रमाणेच लवकरच एमआयडीसीबाबत निर्णय
घेऊ, असे अजित पवार म्हणाले.
पेन्शनप्रश्नावर इतर राज्यांचा अभ्यास
राज्य सरकारने जुनी पेन्शनबाबत सहाय समिती गठीत केली आहे. ही समिती इतर राज्यांनी जुनी पेन्शन कशा स्वरूपात लागू केली, याचा अभ्यास करणार आहे. साधकबाधक चर्चा होऊन यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.