नागपूर : नागराज मंजुळे दिग्दर्शित व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या झुंड चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याला चोरीप्रकरणातअटक करण्यात आली आहे. ५ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख लंपास केल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी या अभिनेत्याला अटक केली आहे.
नागपूरच्या मानकापूर भागातील प्रदीप मोंडवे यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरुन पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितास पकडून विचारपूस केली असता त्याने या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा (१८) सहभाग असल्याचे सांगितले. यानंतर मंगळवारी पोलिसांनी प्रियांशूला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाण्यात आली आहे. तसेच नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
चुकीचे पाऊल सुधारण्यासाठी झुंजतेय नऊ जणांची 'झुंड'!
प्रियांशूने मंजुळेंच्या चर्चित झुंड या चित्रपटात 'बाबू' हे पात्र साकारले होते. या चित्रपटात फुटबॉल सामन्याचे दृश्य आहे. फुटबॉल संघात त्याची मुख्य भूमिका होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्याने परिसरात त्याचे अनेक चाहते बनले होते. तसेच, त्याच्या चित्रपटातील डायलॉग्स व नागपुरी बोलीभाषेच्या शैलीने तो चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन व्यतिरिक्त किशोर कदम, छाया कदम, रिंकु राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, अंकुश गेदाम यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट विजय बारसे या माजी क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी फुटबॉलशी परिचय करुन दिला.