नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी निर्णयासाठी पुन्हा एकदा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या दालनात बुधवारी चर्चेला आली. त्यात नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेशकुमार यांचे नाव चर्चेला आले. मात्र येथील पोलीस आयुक्तांच्या पदाच्या श्रेणीमुळे अमितेशकुमार पोलीस आयुक्त म्हणून की सहपोलीस आयुक्त म्हणून येथे रुजू होणार याबाबत वृत्त लिहीस्तोवर संभ्रम होता.येथे गेल्या दोन वर्षांपासून पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळणारे डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी गेल्या पाच महिन्यात अर्थात कोरोना संक्रमणाच्या कालावधीत केलेली कामगिरी प्रशंसनीयच नव्हे तर भूषणावहही आहे. मात्र त्यांचा नोकरीचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणे निश्चित आहे. ती आता करावी की ठाणे आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांप्रमाणेच त्यांनाही पुन्हा येथेच तात्पुरती मुदतवाढ देऊन थांबवून घ्यावे, हे बुधवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. त्यांची बदली झाल्यास येथे राजेंद्रसिंग पोलीस आयुक्त म्हणून रुजू होतील, असे १५ दिवसांपूर्वी ठरविण्यात आले होते. परंतु आज राजेंद्रसिंग यांच्या जागी अमितेशकुमार यांचे नाव नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून चर्चेला आले आहे. सध्या ते राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्तपद अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या श्रेणीचे आहे. अर्थात अमितेशकुमार यांना येथे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करायचे असल्यास सरकारला त्यांचे प्रमोशन करावे लागेल. अन्यथा नागपूरच्या आयुक्तपदाची श्रेणी कमी करून ते पद महानिरीक्षक दर्जाचे करावे लागेल. या दोन्ही बाबी सरकार करू शकतात. अमितेशकुमार यांची कौतुकास्पद सेवा तसेच सेवाकाळ बघता त्यांची पदोन्नती कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे ते नागपूरचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळू शकतात.अनेकांच्या गुडबुकमध्येआपल्या कार्यशैलीमुळे अमितेशकुमार सध्या गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक या तिघांच्याही ‘गुडबुक’मध्ये आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात आयुक्त बनविण्याचे निश्चित झाल्याची सुत्रांची माहिती आहे. गृहमंत्र्याचे होमटाऊन असलेल्या नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि उपयुक्त ही पदे अद्याप भरण्यात आलेली नाही. पदोन्नतीचा मुद्दा लक्षात घेतल्यास आणि तांत्रिक बाबींमुळे पदोन्नतीला उशीर झाल्यास अमितेशकुमार यांना सहपोलिस आयुक्तांची जबाबदारी देऊन नागपुरात बदली केली जाऊ शकते. काही दिवसानंतर पदोन्नती करून त्यांना येथे नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू करून घेतले जाऊ शकते. त्यामुळे सध्या अमितेशकुमार नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून रुजू होणार की सहआयुक्त म्हणून, त्याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.धडाकेबाज अधिकारी१९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अमितेशकुमार २० आॅक्टोबर २००५ ते ६ जुलै २००७ असे दोन वर्षे नागपूरला परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केली होती.