नागपूर : माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या राजकीय दबावामुळे पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे गणेश चक्करवार यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून अवैध कारवाई करीत आहेत, असा गंभीर आरोप मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. समीर पालतेवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल अटकपूर्व जामीन अर्जामध्ये केला आहे.
डॉ. पालतेवार हे मेडिट्रिना इन्स्टिट्यूटचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केअर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. गणेश चक्करवार हे या कंपनीचे संचालक असून त्यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२१ रोजी पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा चक्करवार यांचा आरोप आहे. यासाठी त्यांनी तीन रुग्णांच्या बिलांचे उदाहरण दिले आहे. पालतेवार यांनी घोटाळ्याचा आरोप फेटाळला आहे. पालतेवार यांच्याकडे कंपनीचे ६७ टक्के समभाग आहेत. फेब्रुवारी-२०२० ते जानेवारी-२०२१ या काळात कंपनीने ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. त्यामुळे त्यांनी केवळ ५ लाख रुपयांसाठी संगणकीय बिलात बदल केल्याचा आरोप करणे हास्यास्पद असल्याचे अर्जात नमूद करून पोलीस यंत्रणेवर संबंधित गंभीर आरोप करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या कुटुंबीयांचे कंपनीमध्ये समभाग होते. दरम्यान, चक्करवार यांनी त्यांना मोठी रक्कम अवैधपणे हस्तांतरित केली होती. तेव्हापासून ते कंपनीमध्ये रुची घेऊन अधिकाधिक रक्कम मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातून पोलीस आयुक्त अमितेशकुमार व इतर पोलीस अधिकारी हे चक्करवार यांनी केलेल्या तक्रारीवरून पालतेवार यांना आर्थिक घोटाळ्यात फसवत आहेत. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक ए. ए. सबनीस यांनी पालतेवार यांना फोन करून सिव्हिल लाईन्समधील पोलीस जिमखाना येथे अमितेशकुमार यांना भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार पालतेवार यांनी पोलीस जिमखाना येथे पोहचून बोलावण्याचे कारण विचारले असता अमितेशकुमार यांनी आक्रमक भाषा वापरायला सुरुवात करून सबनीस यांना पालतेवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे व त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या संवादामधून ही कारवाई राजकीय दबावाखाली केली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते असा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
----------------
चक्करवार यांनीच केली अफरातफर
तक्रारकर्ते चक्करवार यांनीच कंपनीत आर्थिक अफरातफर केली असा दावाही पालतेवार यांनी अर्जात केला आहे. मेडिट्रिना हे कॉर्पोरेट रुग्णालय असून येथील बिलिंग व अकाऊन्ट विभाग स्वतंत्रपणे कार्य करतात. रेकॉर्ड व्यवस्थापनासाठी मेडनेट सॉफ्टवेयरचा उपयोग केला जातो. पालतेवार यांचा बिले व अकाऊन्ट विभागाशी थेट संबंध नाही. त्यामुळे पालतेवार यांनी रेकॉर्ड पडताळण्याची विनंती केल्यानंतर सबनीस व आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक बेसेरकर यांनी पालतेवार यांना पोलीस वाहनात बसवून रात्री ९.३० च्या सुमारास रुग्णालयात आणले. दरम्यान, संगणकीय यंत्रणा तपासल्यावर तीन बिलांमध्ये अवैधरित्या बदल करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, तो बदल खुद्द चक्करवार यांनी केल्याचे आढळले. चक्करवार यांनी स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड वापरून ४ डिसेंबर २०२०, १० फेब्रुवारी २०२१, १२ फेब्रुवारी २०२१ व १९ फेब्रुवारी २०२१ रोजी संबंधित बदल केले. असे असताना पोलिसांनी बेकायदेशीरपणे वागून अत्यंत घाईने व चौकशी न करता पालतेवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला याकडे अर्जात लक्ष वेधण्यात आले आहे.