लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा ठगबाज नागसेन वेल्लोर हा ऐशोआराम व मटक्याचा शौकीन आहे. तो लोकांना फसवून जमवलेली रक्कम मैत्रिणी आणि मटक्यावर उडवत होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी नागसेन दोन महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होता. सध्या त्याने गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील भिवसनखोरी येथे आश्रय घेतला होता. धंतोली पोलिसांनी गुरुवारी त्याची महिला नातेवाईक अनिता वेल्लोर हिलाही अटक केली आहे.पोस्ट खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने लोकांना कोट्यवधी रुपयाने फसविले आहे. तो सध्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात आहे. तो महिला साथीदराच्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. २०११ पासून तो ही टोळी चालवित आहे. आतापर्यंत त्याने १०० पेक्षा अधिक लोकांना फसवले आहे. धंतोली पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात ५० पीडित सापडले आहेत. त्याने एक कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली आहे. नागसेनचे जाळे नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पसरले होते. तो अनिता, फरार आरोपी कविता वाघमारे आणि इतर महिला सदस्यांच्या माध्यमातून लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. त्याच्या टोळीत सामील असलेल्या महिला सदस्य कामकाजानिमित्त लोकांमध्ये सक्रिय राहत होत्या. उदाहरणार्थ कविता वाघमारे ही आॅटोचालक आहे. ती आॅटो चालवत असतानाच नागसेनसाठी सावज शोधायची. ती नागसेनच्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवाची. नागसेन बोगस नियुक्ती पत्र, अनुभव पत्र आदी देऊन लोकांचा विश्वास संपादित करायचा.नागसेनद्वारे सुरु असलेली फसवणूक अगोदरच उघडकीस आली होती. पीडितांनी त्याच्याविरुद्ध जरीपटका, वाडीसह अनेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही. तेव्हापासून नागसेन सतर्क झाला होता. तो घर बदलवून राहू लागला. त्याच्यासोबतच अनिता वेल्लोरसुद्धा भूमिगत झाली. ती एक महिन्यापासून घरातून गायब होती. तिच्या पतीने कन्हान पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली हेती. अनिता नागसेनची मदत करीत होती. ताज्या प्रकरणात तक्रार येताच धंतोली पोलीस नागसेनच्या शोधात निघाले. भिवसनखोरी येथील घरी पोलिसांनी धाड टाकली तेव्हा तो सापडला नाही.तेव्हा त्याच्या एका पीडिताला गाठून एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून त्याला धंतोलीतील उद्यानाजवळ बोलावण्यात आले. आमिषापोटी तो आला आणि पोलिसांच्या हाती लागला.नागसेनने फसवणुकीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची कमाई केली आहे. या कमाईतून त्याने बेनामी संपत्ती खरेदी केली आहे. ही संपत्ती त्याच्या नातेवाईकाच्या नावावर असल्याचा संशय आहे. त्याची सहा बँक खातीही सापडली आहे. परंतु त्यात पैसे नसल्याची शक्यता आहे. नागसेन सापडले जाऊ म्हणून अनेक दिवसांपासून सतर्क होता. त्याला ऐशोआराम आणि मटक्याचे व्यसन आहे. त्याच्या महिला मैत्रिणींची संख्याही खूप असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर तो मोठी रक्कम उडवत असल्याचा संशय आहे. यासोबतच तो रोज मटक्यातही रक्कम उडवत असतो. पोलिसांना त्याने अजूनही खरी माहिती सांगितलेली नाही. सक्तीने विचारपूस झाल्यास खरा प्रकार समोर येऊ शकतो.