नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ज्या बँकेच्या एटीएममधून त्यांनी रक्कम उडवली, त्याच बँकेच्या अधिकाऱ्यांनी, त्याच चोरट्यांच्या खात्यात रक्कम टाकली. होय, धक्कादायक वाटत असले तरी हे खरे आहे. खुद्द चोरट्यांनीच ही माहितीवजा कबुली पोलिसांकडे दिली आहे.
नवी ‘चाैर्यशैली’ अंगिकारणारे इकबाल खान, अनिस खान, मोहम्मद तालिब नामक गुन्हेगार हरियाणातील पलवल-मेवात गावचे रहिवासी आहेत. ते २१ ते २५ वयोगटातील आहेत. कुणाला कसलीही दुखापत न करता झटक्यात लाखो रुपये उडविण्याचे अफलातून तंत्र त्यांनी दोन वर्षांपूर्वी अवगत केले आणि देशातील अनेक शहरात जाऊन विविध बँकांना लाखोंचा चुना लावला. १४ ते १६ जूनच्या दरम्यान या तिघांनी नागपुरातील चार ठिकाणचे एटीएम हॅक करून ६.७५ लाख रुपये काढून घेतले. रक्कम काढताना एटीएममध्ये तब्बल ६७ वेळा एकच एटीएम कार्डचा वापर करण्यात आला. मात्र, कोणताही व्यवहार पूर्ण झाल्याची नोंद बँकेच्या सर्वरमध्ये दिसत नव्हती. त्यामुळे ही रक्कम चोरणाऱ्यांना हुडकून काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. ते स्वीकारून पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी या तपासाकडे लक्ष केंद्रित केले. ज्या एटीएम कार्डचा वापर झाला, ते कुणाच्या नावे आहे, ते पोलिसांनी आधी शोधले आणि नंतर त्या कार्डधारकाच्या माध्यमातून पलवल (हरियाणा) गाठत इकबाल खान, अनिस खान, मोहम्मद तालिब या तिघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी या चोरीची कबुली दिली. सोबतच चोरीसोबत शिरजोरीचाही किस्सा पोलिसांना सांगितला. तो स्तंभित करणारा आहे. आरोपींनी नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, मुंबई, भुवनेश्वर, कटक, मिदनापूर, कोलकाता, कर्नाटक, बिदर, आंध्र प्रदेश आणि विशाखापट्टणम या ठिकाणी अशी चोरी केली. त्याचवेळी त्यांनी भुवनेश्वर, कटक, बिदर आदी ठिकाणी मनासारखी रक्कम न मिळाल्याने लगेच संबंधित बँकेच्या एटीएममधून हेल्पलाईनवर फोन केला. आमचा व्यवहार पूर्ण झाला नाही. रक्कम अडकून पडली आहे, अशी तक्रार नोंदवली. आश्चर्य म्हणजे, बँक अधिकाऱ्यांनी ‘टेक्निकल फॉल्ट’ मान्य करीत आरोपीच्या बँक खात्यात काही दिवसांनी रक्कम जमा केली. उपरोक्त तीन ठिकाणचे नाव आठवत असले तरी अशा प्रकारे अनेकदा आम्ही आमच्या खात्यात रक्कम वळती करून घेतल्याचेही इकबाल, अनिस आणि तालिबने पोलिसांना सांगितले आहे.
----
चोरीनंतर गोवा, मुंबईत माैजमजा
चोरीचे अफलातून तंत्र अवगत करणारे हे भामटे अय्याशीचे जीवन जगत होते. त्यांनी क्रेटा कार विकत घेतली. याच कारने ते वेगवेगळ्या प्रांतात फिरत होते. रस्त्यात लागलेल्या प्रत्येक मोठ्या शहरात हात मारायचा आणि आठ - दहा लाखांची रक्कम एकत्र झाली की गोवा, मुंबईत जाऊन अय्याशी करायची, अशी त्यांची सवय होती. चोरलेली लाखोंची रोकड त्यांनी अशाच प्रकारे उडविल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
---
विविध बँकांची रक्कम सुरक्षित
देशभरातील अनेक बँकांना त्यांचे एटीएम आता अधिक सुरक्षित कसे करता येईल, ते या प्रकारातून ध्यानात घ्यावे लागणार आहे. कारण दोन वर्षांपासून एटीएम हॅक करून रक्कम काढण्याचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता. पोलिसांकडे तक्रार करून बँक अधिकारी गप्प बसत होते. गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करून ठिकठिकाणचे पोलीस गप्प बसत होते. टेक्नोसॅव्ही डीसीपी म्हणून ओळख असलेल्या नुरूल हसन यांनी मात्र तीन आठवड्यात या टोळीला हुडकून काढले अन् विविध बँकांची कोट्यवधींची रक्कम तूर्त सुरक्षित केली.
---