मेहा शर्मा
नागपूर : आपली कला आणि सोशल मीडियाचा वापर करून अवघ्या आठ वर्षांच्या असलेल्या जहाना वली या चिमुकलीने आपल्या मेहनतीची कमाई कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दान केली आहे. टी शर्टवर रंगांची कलाकुसर करून तिने त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री करून हजारो रुपये कमविले अन् ही रक्कम कोरोनाच्या रुग्णांसाठी दान केली. हे समाजकार्य करून जहानाने समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
जहाना वली हिने दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात सुरू असलेल्या कला प्रशिक्षण शिबिरात ही कला अवगत केली होती. काही महिन्यांनंतर तिची यात रुची वाढू लागली. तिच्या आईवडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले. त्यासाठी रंगांसह इतर आवश्यक साहित्य तिला पुरविले. त्यानंतर जहानाने टी शर्टवर रंगाची कलाकुसर सुरू केली. पाहणाऱ्यांना हे टी शर्ट आकर्षक वाटू लागले. सुरुवातीला तिने आपल्या परिवारातील काही सदस्यांना हे टी शर्ट भेट दिले. त्यानंतर चांगले काम होऊ लागल्यानंतर तिची आई निहारिगा वलीने या कलेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘जेज शॉप’ इन्स्टाग्राम पेज तयार केले. त्यांनी जहानाने तयार केलेले टी शर्टचे फोटो या प्लॅटफार्मवर अपलोड करणे सुरू केले. त्यानंतर अनेक नागरिकांनी हे टी शर्ट खरेदी केले. यातून जमा झालेली रक्कम कशी खर्च करावी, हा विचार सुरू असताना जहाना व तिच्या आईवडिलांनी ही रक्कम कोरोनाच्या रुग्णांच्या मदतीसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १५ मे रोजी सेवा किचन संस्थेला १८ हजार रुपयांचे पहिले दान करण्यात आले. या महिन्यात दानाची रक्कम दुप्पट झाली आहे. जहानाने ६५ टी शर्ट तयार करून ठेवले आहेत. मागील आठवड्यात दानवीर उपक्रमाला १५ हजार रुपये दिले. आपल्याला समाजाची सेवा करण्यात आनंद मिळत असल्याचे सांगून यापुढेही शक्य तेवढी रक्कम दान करण्याचा मानस तिने व्यक्त केला.
...............