लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्लिपकार्टच्या पार्सलची रक्कम परस्पर लंपास करणाऱ्या डिलिव्हरी बॉयविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रितिक राकेश शुक्ला (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. तो हरिजन कॉलनी जरीपटका येथे राहतो.गिट्टीखदानमधील तवक्कल लेआऊटमध्ये महावीर कॉम्प्लेक्स असून, येथे फ्लिपकार्टचे कार्यालय आहे. येथे आलेले पार्सल ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे आणि त्यांच्याकडून मिळालेली रक्कम कार्यालयात जमा करण्याचे काम रितिककडे होते. १९ आॅगस्टला दुपारी १२.४५ वाजता आरोपी रितिकने तेथून ग्राहकांच्या आॅर्डरचे १० पार्सल घेतले. ते पार्सल त्याने संबंधित ग्राहकांकडे पोहोचवले. मात्र, त्यापोटी आलेले १ लाख, ३,१९५ रुपये रितिकने फ्लिपकार्टमध्ये जमा न करता ती रक्कम लंपास केली. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर रितिककडे विचारणा करण्यात आली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अब्दुल मुज्जफर जाफर अहमद (वय २७, रा. नालसाहबर रोड, हंसापूरी) यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी रितिकची चौकशी केली जात आहे.चाकूच्या धाकावर लुटमारट्युशन क्लाससमोरून दोन युवकांना चाकूच्या धाकावर पळवून नेऊन एका गुंडाने त्यांचे मोबाईल, मोटरसायकल तसेच रोख रक्कम हिसकावून नेली. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.रितेश अजय सारोके (वय १८, रा. शांतिनगर) हा त्याच्या एका मित्रासोबत भरणे ट्युशन क्लासेसजवळ गुरुवारी रात्री उभा होता. तेवढ्यात तेथे थापा नामक गुंड आला. त्याने रितेशला चाकू लावला. मला समोरच्या चौकात सोडून दे, असे म्हणत त्याने रितेश आणि त्याच्या एका मित्राला रितेशच्याच मोटरसायकलवर (एमएच ४९/ एएच २९६४) जबरदस्तीने बसवले. त्यांना कावरापेठ, रेल्वेक्रॉसिंगसमोर अंधारात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत रितेश आणि त्याच्या मित्राजवळचे दोन मोबाईल, मोटरसायकल आणि पाच हजार रुपये रोख असा मुद्देमाल हिसकावून आरोपी थापा पळून गेला. रितेशने या घटनेची तक्रार शांतिनगर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपीने चाकूच्या धाकावर युवकांना पळवून नेले तरी पोलिसांनी फक्त जबरी चोरीचेच कलम आरोपी थापाविरुद्ध लावले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संबंधाने शांतिनगर पोलिसांकडे विचारणा केली असता आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.