लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत उघड झालेल्या कर्ज घोटाळ्यात दलालच नव्हे तर बँकेत कार्यरत असलेल्या आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घोटाळ्याची रक्कम लाखांत नव्हे तर कोट्यवधीत असल्याचाही संशय आहे. त्यामुळे पोलीस या कर्ज घोटाळ्याची वेगवेगळ्या अँगलने चौकशी करीत आहेत.बँकेतील वरिष्ठांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला. आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेतील व्यवस्थापक आनंद निंबाजी तुपे (वय ३४, रा. खामला) यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुरुवारी अनघा निखिल भुसारी (वय ३४, रा. प्रसादनगर, जयताळा), अमोल रविकिरण कुंभारे (रा. हसनबाग) आणि मंगेश रंजित जगताप (रा. रचना युतिका अपार्टमेंट) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, आरोपी अनघा भुसारी ही आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तीच या कर्ज घोटाळ्याची सूत्रधार असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. २१ ऑगस्ट २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आरोपी अनघा भुसारी, अमोल कुंभारे आणि मंगेश जगताप यांनी कर्जाचे आवेदन करणाऱ्या गरजू मंडळींकडून कागदपत्रे गोळा केली. त्यांना तुमचे कर्जप्रकरण नामंजूर झाले असे सांगून त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला आणि भलत्याच व्यक्तीला त्यांच्या नावावर बँकेत उभे केले. अशा प्रकारे कागदपत्रे एकाची आणि व्यक्ती दुसराच उभा करून बनावट नोंदीच्या आधारे आरोपींनी लाखोंचे कर्ज उचलले. त्यातील पांडे नामक व्यक्तीच्या नावावर ३५ लाखांचे कर्ज उचलल्याचे उघड झाले आहे. त्यावरून बँक व्यवस्थापक आनंद तुपे यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी ११ जुलैला गुन्हा दाखल केला. आरोपींनी इतवारी शाखेसोबतच आंध्रा बँकेच्या मानेवाडा, बोखारा शाखेतूनही गृहकर्ज, वाहनकर्ज आणि मुद्राकर्ज उचलले आहे. त्यामुळे अनघा भुसारी, अमोल कुंभारे आणि मंगेश जगताप यांच्या टोळीत बँकेत कार्यरत आणखी काही जणांचा समावेश असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
आंध्रा बँकेत कर्ज घोटाळ्याची रक्कम कोट्यवधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 9:22 PM
आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत उघड झालेल्या कर्ज घोटाळ्यात दलालच नव्हे तर बँकेत कार्यरत असलेल्या आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घोटाळ्याची रक्कम लाखांत नव्हे तर कोट्यवधीत असल्याचाही संशय आहे. त्यामुळे पोलीस या कर्ज घोटाळ्याची वेगवेगळ्या अँगलने चौकशी करीत आहेत.
ठळक मुद्देअनेक आरोपींचे बुरखे फाटण्याची शक्यता