नागपूर : यावर्षी कोरोनाकाळात १६ एप्रिलला राज्य शासनाने मे महिन्यात मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. घोषणा होताच रेशन दुकानदारांद्वारे विभागाकडून वसुली करण्यात आली. दोन महिने झाल्यानंतरही रेशन दुकानदारांकडून वसूल केलेली रक्कम त्यांना परत केलेली नाही.
मोफत धान्य देण्याच्या घोषणेनंतर वितरणात उशीर झाला. अनेक लाभार्थ्यांनी मोफत धान्याची रक्कम चुकती केली होती आणि अशा लोकांना पुढील महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात आले होते. मोफत धान्य वाटल्यानंतर रेशन दुकानदारांचा फसवणूक झाल्याचा समज झाला आहे. या दुकानदारांना एप्रिलमध्ये वसूल करण्यात आलेली चालानची रक्कम जूनमध्ये परत करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
रेशन दुकानदार संघाचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल म्हणाले, पूर्वी कमिशन कापून चालानची रक्कम भरावी लागत होती, पण आता कमिशनची रक्कमही चालानसोबत भरावी लागते. मोफत धान्य देण्याच्या घोषणेसोबतच रेशनचे चालान भरणे सुरू झाले होते. अशा स्थितीत विभागाने दुकानदारांकडून ही रक्कम वसूल करायला नको होती. ही रक्कम जूनमध्ये त्यांच्या खात्यात परत येईल, असे त्यावेळी सांगितले होते, पण असे झाले नाही. आता जुलैकरिता भरण्यात येणाऱ्या चालानमध्ये कमिशनच्या रकमेसोबत प्रदान करावी लागत आहे. मोफत धान्याची रक्कम वसूल करण्याच्या प्रकरणात डीएसओ आणि एफडीओ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.