लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात रद्द झालेल्या विमान प्रवासाच्या तिकिटांचे पैसे परत न करता रिशेड्युलिंगसाठी पूर्वीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुपटीहून जास्त रक्कम काही विमान कंपन्या मागत आहेत. याशिवाय प्रवाशांनी दिलेले पर्याय कंपन्या नाकारत आहेत, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.तीन महिन्यापूर्वी विमानाचे तिकीट कमी किमतीत मिळत असल्याने अन्य प्रवाशांप्रमाणेच हरिहर पांडे यांनी १७ मार्चला ३० जुलैची नागपूर-मुंबई प्रवासाची २,६९५ रुपये दराने ५० ग्रुप तिकिटे काढली. पण कोविड-१९ मुळे ३० जुलैला ग्रुपने प्रवास करणे शक्य नसल्याने पांडे यांनी संबंधित कंपनीकडे तिकिटे रद्द करून रक्कम परतीची मागणी केली. पण कंपनी पैसे परत देण्यास तयार नसल्याने त्यांनी कंपनीकडे आंतरराष्ट्रीय नियमानुसार क्रेडिट सेल (देशात कुठल्याही क्षेत्राची तिकीट मागण्याचा अधिकार), रिशेड्यूल आणि वर्षात दोन पर्यायी तारखा, असे तीन पर्याय ठेवले. नागरी हवाई उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ११ मार्च ते ३१ मेपर्यंत विमान तिकिटांचे बुकिंग केलेल्यांना प्रवासाचे रिशेड्यूल करताना अतिरिक्त शुल्क लागणार नाही. पण संबंधित कंपनी अतिरिक्त रक्कम घेऊन रिशेड्युलिंग करीत असल्याचा आरोप पांडे यांनी लोकमतशी बोलताना केला. अशा आर्थिक लुबाडणुकीची दखल नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घ्यावी आणि प्रवाशांना विमानाच्या तिकिटांचा परतावा त्वरित देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पांडे यांनी केली.
विमान तिकिटाच्या रकमेपेक्षा रिशेड्युलिंगच्या तिकिटांची रक्कम जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:38 AM