लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आधी बीसीच्या नावाखाली आणि नंतर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने दुसऱ्या एका महिलेचे १० लाख ७१ हजार रुपये हडपले. गीता सदाशिव भातखंडे (वय ५३) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती एमआयडीसीतील वैशालीनगरात राहते.
पूनम रामलखन मिश्रा (वय ३६, रा. विद्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भातखंडे नामक महिला २०१४ मध्ये बीसी चालवायची. थोडी थोडी रक्कम महिन्याला जमा केल्यानंतर एकसाथ मोठी रक्कम हाती पडत असल्याचे सांगून ती बीसीची रक्कम गोळा करायची. यात सहभागी झालेल्या सभासदांना नंतर तिने आपल्या सोसायटीत रक्कम गुंतविल्यास अल्पावधीत जास्त व्याज मिळेल, असे आमिष दाखवून त्यांची रक्कम स्वत:कडे ठेवणे सुरू केले. पूनम मिश्रा यांनी २१ सप्टेंबर २०१४ ते २५ जून २०१९ या कालावधीत आरोपी भातखंडेकडे १० लाख ७१ हजार ६० रुपये जमा केले. नियोजित कालावधीतनंतर पूनम यांनी आपली रक्कम मिळावी म्हणून भातखंडेकडे तगादा लावला. मात्र, तिने ही रक्कम परत केली नाही. भातखंडेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने पूनम यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
---
अनेकांची फसवणूक
भातखंडे हिने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली असावी, असा संशय आहे. पोलीस त्या अनुषंगानेही चाैकशी करीत आहेत.
---