नागपूर : विदर्भामध्ये नाेव्हेंबर महिन्यात दिवसागणिक थंडीचा जाेर वाढत चालला आहे. या महिन्यात बहुतेक जिल्ह्यांत किमान तापमान सरासरी १५ अंशांच्या आसपास असते. मात्र तिसऱ्याच आठवड्यात पारा १२ अंशांच्या खाली घसरला आहे. शनिवारी १०.८ अंशांसह अमरावती सर्वाधिक थंड हाेते तर नागपूरचा पाराही ११.६ अंशांवर घसरला आहे.
उत्तर भारतात बर्फवृष्टी हाेत असून तिकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या प्रभावाने मध्य भारतात थंडी वाढली आहे. दक्षिणेच्या तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडूचेरी या भागात पावसाळी वातावरण कायम आहे. मात्र त्याचा कुठलाही प्रभाव महाराष्ट्रात नाही, पण गारठा वाढला आहे. विदर्भातील जिल्ह्यात शुक्रवारी रात्री किमान तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांनी खाली घसरले. अमरावतीत ही घसरण ६.६ अंश हाेती. नागपूरला रात्रीचा पारा सरासरी ४.३ अंश तर २४ तासांत २.४ अंश खाली घसरला. ११.५ अंशांसह यवतमाळही थंड शहर ठरले. यापाठाेपाठ गाेंदिया १२ अंश, गडचिराेली १३ अंश, वर्धा १३.४ अंश, अकाेला व बुलढाणा १३.३ अंश व चंद्रपूर १४.४ अंशांवर पाेहोचले आहे.
विशेष म्हणजे दिवसाचे तापमानही हळूहळू खाली घसरायला लागले आहे. नागपुरात कमाल तापमान २९.८ अंश हाेते, जे सरासरीपेक्षा १.७ अंशांनी कमी हाेते. यवतमाळ, वर्धा व गाेंदियामध्येही दिवसाचा पारा २९ अंशांवर हाेता. दरम्यान, पुढच्या काही दिवसांत दिवस आणि रात्रीचे तापमान आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात एखादी थंड लाट येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.