नागपूर : ऑटो डीलिंगच्या आड पिकअप वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी या टोळीतील ७ आरोपींना अटक करून ६ वाहनांसह ३०.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अजहर अफसर पठाण (३८), मो. अजहर मो. इकबाल चौधरी (३४), इलियास अली मेहबूब अली (४६), नजीम खान मुस्तफा खान (२४), मो. अहबाब मो. अहमद नईम शेख (२२), वसीम परवेज अब्दुल सिद्दीकी (३८), मो. राजीक मो. जाबीर (४१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मो. अहबाब हा टेकानाका तसेच अमरावतीचा रहिवासी आहे. आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून वाहनचोरी करीत होते. अजहर, वसीम आणि राजीक ऑटो डीलर आहेत. अहबाब चोरीसाठी वाहनांचा शोध घेतो, तर इतर आरोपी वाहनचालक आहेत. नजीम आणि अजहरने तीन महिन्यांपूर्वी कामठीत किरायाने खोली घेतली. त्यानंतर अहबाबला चोरीसाठी वाहन शोधण्यास सांगितले. अहबाब बेरोजगार आहे. ही टोळी माल वाहतुकीसाठी वापर होणारी वाहने चोरी करते. या वाहनांसाठी सहज ग्राहक मिळतात. अहबाब वाहन दिसल्यानंतर साथीदारांना सूचना देतो. त्यांना घटनास्थळी नेण्यासाठी आणि तेथून अमरावतीला जाण्यासाठी सुरक्षित असलेल्या मार्गाची माहिती देत होता.
ही टोळी १ मार्चला कामठीत वाहनचोरी करण्यासाठी पोहोचली. त्याची पोलिसांना माहिती झाली. पोलिसांनी जाळे टाकल्यानंतर आरोपी फरार झाले. पोलिसांना इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सच्या मदतीने आरोपी अमरावतीत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस अमरावतीला पोहोचले. तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडे चोरीचे तीन वाहन सापडले. चौकशीत त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांच्या साथीदारांना अटक करून वाहने जप्त केली. जप्त केलेली वाहने पाचपावली, गिट्टीखदान, जरीपटका आणि यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली आहेत.
शोधत होते ग्राहक
आरोपी चोरी केलेली वाहने नंबरप्लेट बदलवून विकण्याच्या तयारीत होते. ऑटो डीलर असल्यामुळे त्यांना ग्राहकही मिळू लागले. परंतु काही करण्यापूर्वी पोलिसांना त्याची माहिती मिळाली. शहरात वाहनचोरीच्या घटनांचा सहज खुलासा होत नव्हता; परंतु पोलिसांनी या टोळीला गजाआड करण्यात यश मिळविले आहे.