लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाट्यालाही बरेच काही आले आहे. विदर्भातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटींची घोषणा आहे. सोबतच अमरावतीत मेडिकल कॉलेज, वरूड-मोर्शीत संत्राप्रकल्प साकारण्यात येणार आहे.
विदर्भाचा विचार केल्यास नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागाला झुकते माफ देण्यात आल्याचे दिसून येते. राज्य सरकारने ज्या तीर्थस्थळांच्या विकासाची घोषणा केली त्यात मार्कंडा सोडले तर सर्व अमरावती विभागातील आहेत. नागपूर विभागाला मेट्रो रेल्वेची मोठी भेट मिळाली आहे. या माध्यमातून ब्रॉडगेजने नागपूरला वर्धा, रामटेक, भंडारा रोड व नरखेडशी जोडले जाईल. वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गालाही गती देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्ग एक मेपासून नागपूर ते शिर्डी
नागपूर व मुंबईला जोडणारा महत्त्वाकांक्षी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मेगा इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तयार होतील. एक मेपासून या महामार्गावर नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतूक सुरू केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आधीच घोषणा केली होती, हे विशेष.
विदर्भाच्या निधीत कपात
विदर्भाला २०१९-२०च्या अर्थसंकल्पात एकूण बजेटपैकी २७ टक्के निधी मिळाला होता. या अर्थसंकल्पात २६ टक्के वाटा मिळाला आहे. त्याचप्रकारे मराठवाड्यालाही १९.५ टक्के वाटा मिळाला होता. तो यावर्षी कमी होऊन १८.५ टक्के मिळाला. उर्वरित महाराष्ट्राचा वाटा २ टक्केने वाढला आहे.
विदर्भाला काय मिळाले
नागपूर
नागपूर शहर, वर्धा, रामटेक, भंडारा रोड व नरखेड ही शहरे नागपूर मेट्रो मार्गाला जोडण्यासाठी ‘वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन’ हा २६९ किलोमीटर लांबीचा प्रकल्प.
नागपूर येथील प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये ‘वन्य जीव डीएनए तंत्रज्ञान विभाग’ सुरू करणार.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात गोंडवाना थीम पार्कची निर्मिती तसेच सफारी सुरू करणार.
नागपूर येथे राज्याच्या उपराजधानीच्या दर्जाला साजेशा भव्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी नकाशे व अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरू आहे. इमारतीसाठी २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित.
----------
अमरावती
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार.
अमरावती येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या संस्थेतील महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी दहा कोटी रुपये.
आनंदेश्वर मंदिर, लासूर (ता. दर्यापूर, जि. अमरावती) या मंदिरांचे जतन व संवर्धनासाठी निधी.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर (ता. तिवसा, जि. अमरावती) तसेच संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगाव (ता. जि. अमरावती) येथे मूलभूत सुविधा आराखड्यांकरिता निधी.
वरुड व मोर्शी तालुक्यांत अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प.
---------
वाशीम
बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले संत सेवालाल महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा, जि.वाशिम) विकास आराखड्याची कामे पूर्ण करण्याकरीता निधी देणार.
---------
भंडारा
गोसीखुर्द प्रकल्पासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद. प्रकल्प डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन.
---------
गडचिरोली
माडीया गोंड आदिम जमातींसाठी एकात्मिक वसाहत वसविणार.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या उपजीविका वृध्दीसाठीच्या आमचूर व मोहफूल प्रकल्पाला मंजुरी.
शिवमंदिर, मार्कंडा (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) या मंदिरांचे जतन व संवर्धनासाठी निधी.
-----------
अकोला
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला निव्वळ संशोधनासाठी ३ वर्षांत ६०० कोटी रुपये देणार.
--------
या प्रकल्पांचा नुसताच उल्लेख....
अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डिंग तसेच रात्रीच्या विमानवाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची कामे प्रगतिपथावर आहेत.
शिवणी, अकोला येथे मोठ्या विमानांच्या उड्डाणासाठी धावपट्टी वाढविणे व इतर कामांसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड व नागपूर येथील इतवारी ते नागभीड या रेल्वेमार्गांची कामे वेगाने सुरू आहेत.
लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा अंतिम झाला असून, त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येतो आहे.