नागपूर : ओळखीच्या तरुणांचे भांडण सोडवायला गेलेल्या एका व्यक्तीवरच त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गणेश उर्फ बंटी विनायकराव पाटील (३५, दशरथ नगर) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी रात्री ते कामावरून घरी परत जात असताना गिट्टीखदानच्या शेवटच्या बसस्टॉपच्या बाजुला असलेल्या फ्रेंड्स क्लब मैदानात बंटीचा मित्र आशु याला सूरज प्रमोद टेंभुरकर (२५, विश्वासनगर), शेख इर्शाद उर्फ मोनू (३३) व शेख अशरफ उर्फ आशु (३०, राजीवगांधीनगर) हे मारहाण करत होते. बंटीने तेथे जाऊन मध्यस्थी करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या सूरज, शेख व शेख अशरफने बंटीलाच बेदम मारहाण केली. तसेच लाकडी काडीने डोक्यावर प्रहार केले. यात बंटी गंभीर जखमी झाला. त्याला मेयो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज प्रमोद टेंभुरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे