नागपूर : नागपूर कारागृहात अमली पदार्थ आणि मोबाइलचा बिनदिक्कत वापर केला जात असल्याचे आरोप होत असतात. सोमवारी चक्क मोक्काच्या आरोपीला कारागृहात गांजा आणि मोबाइलची बॅटरी घेऊन जाताना अटक करण्यात आली व हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणामुळे शहर पोलीस व कारागृह प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
खापरखेडा येथे राहणारा सूरज कवळे (२२) हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, दरोडा, मारहाण, चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली. तेव्हापासून तो त्याच्या साथीदारांसह तुरुंगात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सूरजची न्यायालयात हजेरी होती. शहर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी सूरजला कारागृहातून मोक्का न्यायालयात नेले. तेथील कार्यवाही संपल्यानंतर त्याला तुरुंगात आणण्यात आले.
दुपारी अडीच वाजता पोलीस कर्मचारी सूरजला घेऊन कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. सूरजकडे कागदपत्रांच्या फायली होत्या. त्यांची तपासणी केली असता त्यात ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाइल बॅटरी लपवून ठेवल्या होत्या. आतील साहित्य सहज सापडणार नाही अशा पद्धतीने फाइल पॅक करण्यात आली होती. परंतु फाइलचे वजन जास्त वाटत असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी फाईल उघडली असता त्यात गांजा व बॅटऱ्या आढळून आल्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तुरुंग प्रशासनाला माहिती दिली. त्यांच्या माहितीवरून धंतोली पोलीस कारागृहात पोहोचले. पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांनी सूरजची प्राथमिक चौकशी केली. अंडरट्रायल कैदी असल्याने त्याला कारागृहात नेण्यात आले आणि गांजा व सर्व बॅटरी जप्त करण्यात आल्या.
गेल्या काही काळापासून कारागृहात मोबाइल फोन, ड्रग्ज सापडणे आणि खंडणीसाठी कैद्यांवर हल्ले होत असल्याची चर्चा कायम आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. वेळोवेळी समोर आलेल्या एकाही प्रकरणात त्यांनी ठोस कारवाई केली नाही. कैद्याची चौकशी करणे शक्य नसल्याचे सांगून पोलीस तपास टाळतात. १५ मोबाईलच्या बॅटरी नेण्याचा प्रयत्न झाल्याने कारागृहात कैद्यांकडे मोबाईल असल्याचे स्पष्ट होत आहे.
'फाइल गेम' अनेक दिवसांपासून सुरू
सूरज कावळे याची चौकशी केली असता एका मित्राने फाइल दिल्याचे त्याने सांगितले. त्याच्या देखरेखीखाली तैनात असलेले पोलीस कर्मचारी वकिलांनी फाइल दिल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे सूरजचा मित्र, वकिलासह पोलीस कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सूरजला देण्यापूर्वी फाइल का तपासण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बऱ्याच कालावधीपासून फायलीच्या आडून अनेकदा ड्रग्ज आणि बॅटरी कारागृहात पोहोचत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हा प्रकार सोमवारी समोर आला.