नागपूर : मॉर्निंग वॉकवरून घरी परतलेल्या दांपत्याच्या घरात शिरून त्यांना मारहाण करत एका आरोपीने त्यांना लुटले. या प्रकरणात ४८ तासांच्या आत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रमेश श्रीधर नेहते (८०, बालाजीनगर विस्तार) हे २८ मार्च रोजी पहाटे पत्नीसोबत वॉकसाठी गेले. सकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी परतले व घरात गेले. त्यानंतर ते पोथी वाचत असताना अचानक एक आरोपी त्यांच्या घरात शिरला व मुख्य दरवाजाची कडी बंद केली. त्याने लोखंडी हातोडीने नेहते यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यांची पत्नी मदतीसाठी धावली असता त्यांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व त्यांना ढकलून आरोपी दार उघडत पळून गेला. या हल्ल्यात नेहते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारतर्फे या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्ही व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून देवेंद्र नारायण सोनसारवे (३६, वसंतनगर, अजनी) याला सीआरपीएफ कॅम्प, हिंगणा येथील टाईम टू क्वॉर्टर क्रमांक १८२ येथून ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेने त्याला अजनी पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे.