नागपूर : मेडिकल इस्पितळातील औषधी विभागात नोकरी असतानादेखील ‘पार्ट टाईम जॉब’चा मोह एका व्यक्तीला चांगलाच महागात पडला. सायबर गुन्हेगारांनी रचलेल्या जाळ्यात संबंधित व्यक्ती अलगद अडकला व २० लाखांहून अधिक रक्कम गमावली. बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.
हरेंद्रसिंह कृष्णराव हळसुले (५७, प्रभूनगर) हे मेडिकलमध्ये कार्यरत आहेत. २५ मार्च रोजी त्यांना टेलिग्राम ॲपवर सौम्या नावाच्या आयडीवरून मॅसेज आला होता व त्यात ‘पार्ट टाईम जॉब’बाबत विचारणा करण्यात आली होती. टुरिस्ट कंपनीच्या स्थळांना रेटिंग देण्याचे घरबसल्या काम असल्याने हळसुले यांनी होकार दिला. रेटिंगचा टास्क पूर्ण झाल्यावर कमिशन मिळेल असे त्यांना सांगण्यात आले.
डेमो टास्क पूर्ण केल्यावर त्यांना ८०० रुपये मिळाले व त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी पुढील टास्कसाठी १० हजार रुपये भरले व त्यांना १८ हजार रुपये मिळाले. ते पैसे त्यांनी खात्यातून काढले नाहीत. प्रिमियम टास्क पूर्ण केल्याशिवाय अगोदरची रक्कम मिळणार नाही, असे संबंधित आयडीवरील व्यक्तीने सांगितले. त्यामुळे हळसुले यांनी ७ ते १२ एप्रिल या कालावधीत २० लाख ७२ हजारांची रक्कम जमा केली. मात्र त्यांना एकही पैसा परत मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर सेलकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.