नागपूर : ‘केव्हीआयसी’शी जुळलेल्या एका खाजगी फर्मच्या कर्मचाऱ्याला १५ हजारांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणात संबंधित फर्मच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी अनुदानाच्या अहवालासाठी ही लाच मागण्यात आली होती.
केव्हीआयसीकडून जेनेसिस या फर्मला केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत अनुदान मागणाऱ्या युनिट्सचा तपासणी अहवाल दाखल करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या फर्मकडून ‘पीएमईजीपी’अंतर्गत अनुदान मागणाऱ्या विविध युनिट्सची तपासणी करण्यात येते व त्यांनाच अहवाल द्यावा लागतो. संबंधित फर्ममध्ये गोपी जांगीर व साहील ठाकूर हे कर्मचारी काम करत होते. भंडारा येथील एका कंपनीला अनुदानासाठी आवश्यक असणारा सकारात्मक अहवाल देण्यासाठी दोघांनीही ४५ हजारांच्या लाचेची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर नकारात्मक अहवाल दाखल करू अशी भितीदेखील दाखवली होती. समोरील व्यक्तीला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने २ जानेवारी रोजी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. या तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने सापळा रचला. दिघोरी येथे १५ हजारांची लाच घेताना साहिल ठाकूरला रंगेहाथ पकडण्यात आले. तर गोपी जांगीरचा शोध सुरू आहे. दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पद्धतीने दोघांनीही किती जणांकडून लाच घेतली याची चौकशी करण्यात येत आहे.