योगेश पांडे
नागपूर : ‘डेटा इज मनी’ असे आजच्या जमान्यात म्हटले जात असताना ‘आयटी’तील कर्मचाऱ्यांना त्याचे महत्त्व अतिशय चांगले माहिती आहे. एका कर्मचाऱ्याने कामावरून काढल्याने कंपनीच्या ‘डेटा’वर हल्ला करत ‘सायबर बदला’ घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ‘एचआर’च्या ‘गुगल बिझनेस अकाउंट’मध्ये ‘लॉगइन’ करून कंपनीच्या तब्बल चार हजार ग्राहकांना वेगवेगळे ‘ई-मेल्स’ पाठविले. सोबतच ‘अकाउंट’मधील ‘डेटा’देखील ‘डिलीट’ केला. या प्रकारामुळे कंपनीत खळबळ उडाली व ‘आयटी पार्क’मध्येदेखील याचीच चर्चा आहे.
नंदन चहांदे (४८, मनीषनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो इंद्रनिल फुके यांच्या ‘सिंपलवर्क सोल्युशन्स प्रा.लि.’ या कंपनीत कामाला होता. त्याची वागणूक व काम बरोबर नसल्याने नंदनला ऑगस्ट २०२२ मध्ये कामावरून काढण्यात आले होते. तेव्हापासून तो बदला घेण्याचे ‘प्लॅनिंग’ करत होता. कंपनीतील अधिकारी किंवा इतर कुणाची बदनामी करण्याऐवजी त्याने वेगळाच मार्ग शोधला. कंपनीसाठी ग्राहक व ‘डेटा’ किती महत्त्वाचा असतो याची त्याला माहिती होती व त्याने त्या दृष्टीने ‘सायबर बदला’ घेण्याचे ठरविले. कंपनीच्या ‘एचआर’च्या ‘गुगल बिझनेस अकाउंट’चा त्याने कुठूनतरी ‘पासवर्ड’ मिळविला. त्यानंतर त्याने संबंधित खात्यावर ‘लॉगइन’ करून कंपनीच्या सर्व ग्राहकांचे संपर्क व ‘डेटा’ मिळविला. हा प्रकार त्याने जानेवारी महिन्यात केला. याची कंपनीतील अधिकाऱ्यांना कुठलीच माहिती नव्हती. त्याने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला संबंधित ‘अकाउंट’चा ‘पासवर्ड’ बदलला व कंपनीच्या ग्राहकांना चार हजारांहून अधिक जास्त ‘ई-मेल्स’ पाठविले. या ‘मेल्स’च्या माध्यमातून त्याने ग्राहकांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पाठविली. अनेक बँका व विमा कंपन्या या महत्त्वाच्या ग्राहक होत्या. अशा प्रकारचे ‘मेल्स’ आल्यामुळे काही ग्राहकांचा गैरसमज झाला व त्यांनी कंपनीला ‘ऑर्डर’ देणेच थांबविले. यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या ‘मेल्स’बाबत चौकशी केली असता नंदनचे नाव समोर आले. कंपनीकडून प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी नंदनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
‘ई-मेल्स’ केले ‘डिलीट’; कर्मचाऱ्यांना पाठविले पत्र
नंदनने हा प्रकार केल्यानंतर संबंधित ‘अकाउंट’मधील सर्व ‘ई-मेल्स’देखील ‘डिलीट’ केले. त्यात अनेक महत्त्वाचे ‘ई-मेल्स’ होते. याशिवाय ‘एचआर’ महिलेने ‘गुगल ड्राइव्ह’मध्ये महत्त्वाचा ‘डेटा’ ठेवला होता. तोदेखील नंदनने डिलीट केला. त्याने कार्यालयाच्या ‘लिंक्डइन’चा पासवर्ड बदलला. सोबतच महिला एचआरचे पोस्टर व त्याखाली लिहिलेला मजकूर असलेले पत्र त्याने कंपनीच्याच कर्मचाऱ्यांना पाठविले. हा प्रकार ऐकून पोलिसदेखील आश्चर्यचकित झाले आहेत.
..असा समोर आला आरोपीचा प्रताप
संबंधित काम कुणी केले याची कंपनीच्या तंत्रज्ञांकडून तपासणी सुरू होती. जानेवारी महिन्यात त्याने ‘डेटा’ चोरत असताना स्वत:च्या ‘ई-मेल’वर काही महत्त्वपूर्ण दस्तावेज पाठविले होते. ते कंपनीच्या ‘ई-मेल’च्या ‘सेंट मेल्स’मध्ये होते. त्यावरून नंदनचे नाव समोर आले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.