नागपूर : तीनवर्षीय बाळाच्या मणक्याच्या आत एक नव्हे दोन हाडे वाढल्याने पायाला अपंगत्व आले. मलमूत्र विसर्जनही अनियंत्रित झाले. मेंदूरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी यांनी शस्त्रक्रिया करून बालकाला जीवनदान दिले. हा एक जगातील दुर्मीळ आजारांपैकी एक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध ‘जर्नल ऑफ क्लिनिकल इमेजिंग सायन्स’नुसार अशा प्रकारची जगातील ही दुसरीच केस आहे.
मध्य प्रदेश येथील तीनवर्षीय आनंदीला (बदललेले नाव) जन्मत: पाठीच्या खालच्या भागात शेपटीसारखा केसांचा पुंजका व गाठ होती. पाठीचा कणा तिरपा होणे सुरू झाले होते. पायात अशक्तपणा आला होता. उभे राहणे व चालताही येत नव्हते. मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण गमावले जात होते. तेथील स्थानिक डॉक्टरांनी तपासून त्यांनी नागपुरात उपचारासाठी पाठविले. डॉ. गिरी यांच्याकडे हे केस आल्यावर त्यांनी बालिकेची तपासणी केली. तेव्हा ‘डायस्टोमॅटोमिया’ व ‘टिथर कॉर्ड’ या अत्यंत दुर्लभ विकाराचे निदान केले.
-मेंदूतून निघालेल्या मुख्य मज्जारज्जूच्या आत हाडाची निर्मिती
डॉ. गिरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या रोगात मेंदूतून निघालेल्या मुख्य मज्जारज्जूच्या आत हाडाची निर्मिती होते. त्यामुळे हळूहळू मज्जातंतूचे कार्य बिघडते. रोजची कार्य करणेही अवघड जाते. विशेष म्हणजे, या बाळाचा पाठीच्या मणक्याच्या हाडातील मज्जारज्जूतील ‘डी-१२’ आणि ‘एल-३’ अशा दोन ठिकाणी अतिरिक्त हाड निर्माण झाले. एरवी हा विकार सामान्यत: आढळू शकतो. मात्र, एकाच वेळी पाठीच्या दोन्ही मणक्यात आणि त्याच वेळी दोन ठिकाणी अतिरिक्त हाड निर्माण होणे हे दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण आहे. जगात नोंदविली गेलेली ही दुसरीच केस आहे.
-बाळाला मिळाले नवे जीवन
बाळाचे वय व आजार पाहता गुंतागुंतीची असलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. डॉ. गिरी म्हणाले, सध्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. तिचे पुढील जीवन सामान्य असेल.
- वेळेत निदानामुळेच अपंगत्व टाळता आले
जन्मत: केसपुच्छ, मोठा डाग किंवा काहीतरी असामान्य असल्यास ‘स्प्लिट कॉर्ड मालफार्मेशन’ असू शकते. अशा बाळांच्या तीन ते चार वर्षांनंतर अचानक चालणे बंद होते. या बाळाचे वेळेत निदान होऊन उपचार झाल्याने अपंगत्व टाळणे शक्य झाले.
-प्रा. डॉ. प्रमोद गिरी, मेंदूरोग शल्यचिकित्सक