योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू-मुस्लिम द्वेष वाढविण्याचा प्रयत्न होत असताना समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे. हिंदू किंवा मुस्लिम असण्याआधी ते नेहमीच मानवतेचा पुरस्कार करतात. असाच आदर्श नागपुरात रज्जाक पटेल यांनी प्रस्थापित केला आहे. हिंदू समाजातील तीन अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे.
भारतनगर येथे राहणाऱ्या रवी आणि वैशाली रावत या दाम्पत्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. रवीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर वैशालीचा किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला. विजय, शिवम आणि किरण या तीन मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्रच हटले. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत व पालनपोषणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली होती. त्यांचे शेजारी पटेल यांना हा प्रकार बघविल्या गेला नाही. त्यांनी तीनही मुलांचे पालकत्व घेण्याची तयारी दाखविली. रज्जाक पटेल यांनी विजय, शिवम आणि किरण यांच्या संगोपनासोबतच त्यांना इच्छा असेल तोपर्यंत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. आता ते तिघांचेही शिक्षण आणि इतर गरजा सांभाळतील. मी केवळ मानवतेचेच काम केले आहे. त्या मुलांना आधाराची व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. एक शेजारी व नागरिक म्हणून त्यांना सांभाळणे माझे कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.