नागपूर : सणासुदीच्या तोंडावर डेंग्यूचा प्रकोप वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात या आजाराच्या रुग्ण दिसून येत आहेत. मागील १५ दिवसांत डेंग्यूचे ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. रोज जवळपास चार रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण २०२१ मध्ये आढळून आले होते. त्यावेळी नागपूर शहरात १ हजार २५४ रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत २०२२ मध्ये केवळ ११८ रुग्ण होते. परंतु या वर्षी रुग्ण वाढताना दिसून येत आहे. जानेवारीत ५, फेब्रुवारीत ४, मार्चमध्ये ४, एप्रिलमध्ये ३, मेमध्ये २, जूनमध्ये ५५, जुलैमध्ये ७८ तर १५ ऑगस्टपर्यंत ५९ असे एकूण २१० रुग्णांची नोंद झाली आहे.
- १५ दिवसांत १,२४५ संशयित रुग्ण
नागपूर शहरात जुलै महिन्यापर्यंत डेंग्यू संशयीत रुग्णांची संख्या ५६६ असताना मागील १५दिवसांत १,२४५ संशयितांची भर पडली. सध्या १,८०१ रुग्ण आहेत. या रुग्णांची लक्षणे डेंग्यू सारखीच असल्याने घराघरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- डेंग्यूपासून असा करा बचाव
: लहान मुलांना पूर्ण हातांचे कपडे घाला: कु लरच्या टाकीत पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या: घरात व आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवा व कोठेही पाणी साठू देऊ नका: रात्री झोपताना मछरदाणीचा वापर करा.: लहान मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.: कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा.