नागपूर : २२ मे रोजी ६१,२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोन्याचे दर १२ जुलैला ५९,५०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. याआधी ३० जून रोजी दर ५८,५०० रुपये होते. अर्थात १२ दिवसांत सोने एक हजार रुपयांनी आणि ११ जुलैच्या तुलनेत १२ रोजी अर्थात एकाच दिवसात दहा ग्रॅम (२४ कॅरेट) सोन्याचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. दरवाढीमुळे सराफा बाजारात पुन्हा उत्साह संचारणार आहे.
दागिन्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरात एकाच दिवसात ४०० रुपयांची वाढ होऊन भाव ५६,१०० रुपयांवरून ५६,५०० रुपयांवर पोहोचले. ग्राहक सोने खरेदीसाठी दर आणखी कमी होण्याची वाट पाहात होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत बाजारात ग्राहकी कमी होती. पण आता दरवाढीमुळे ग्राहक खरेदीसाठी बाहेर निघतील, अशी सराफांना अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींमुळे शुद्ध चांदीचे किलो दर एकाच दिवसात तब्बल १६०० रुपयांनी वाढले. ११ जुलैच्या ७१,८०० रुपयांच्या तुलनेत १२ जुलैला ७३,४०० रुपयांवर स्थिरावले. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्याने दरवाढ झाल्याचे सराफांनी सांगितले. याआधी २२ मे रोजी चांदीचे दर ७३,४०० रुपये होते, हे विशेष.