मातापित्याच्या भांडणात मुलांची हेळसांड नको; हायकोर्टाने टोचले उच्चशिक्षित दाम्पत्याचे कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 10:49 AM2022-09-28T10:49:22+5:302022-09-28T10:53:19+5:30
न्यायालयाने उच्चशिक्षित दाम्पत्येही मुलाच्या भावनांचा विचार करीत नसल्याचे पाहून खंत व्यक्त केली
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका उच्चशिक्षित व सधन दाम्पत्याचे कान टोचताना दाम्पत्यामधील भांडणामुळे निरागस मुलाची पिळवणूक व्हायला नको, असे मत व्यक्त केले.
नागपूर येथील मूळ रहिवासी असलेले हे दाम्पत्य अमेरिका येथे स्थायिक झाले होते. दोघेही आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या वेतनावर काम करीत होते. दरम्यान, मतभेद विकोपाला गेल्यानंतर पत्नी मुलाला घेऊन भारतात आली. तिने हे पाऊल उचलताना पतीची परवानगी घेतली नाही, तसेच यासंदर्भात अमेरिका येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचाही विचार केला नाही. करिता, पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून मुलाला हजर करण्याचे निर्देश पत्नीस देण्याची विनंती केली होती.
दरम्यान, न्यायालयाने उच्चशिक्षित दाम्पत्येही मुलाच्या भावनांचा विचार करीत नसल्याचे पाहून खंत व्यक्त केली आणि हे शहाणपणा व परिपक्वतेच्या अभावाचे उदाहरण आहे, याकडे लक्ष वेधले. प्रकरणातील पती-पत्नी दोघेही नोकरीवर आहेत. त्यांना कशाचीच कमतरता नाही. परंतु, मुलाच्या ताब्याविषयी निर्णय देताना त्याचे हित कशामध्ये आहे, हे तपासणे सर्वांत जास्त महत्त्वाचे असते, असे न्यायालयाने सांगितले व संबंधित दाम्पत्याला मुलाच्या ताब्याचा वाद अमेरिकेतील समक्ष न्यायालयामधून सोडविण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय मनीष पितळे व वाल्मीकी एसए मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
दाम्पत्य २०२१ पासून विभक्त
पती २००६पासून अमेरिका येथे कार्यरत आहे. या दाम्पत्याची २०१३ मध्ये वैवाहिक वेबसाइटवरून ओळख झाली व एकमेकांना समजून घेतल्यानंतर ते २० नोव्हेंबर २०१३ रोजी विवाहबद्ध झाले. दरम्यान, त्यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर मतभेद वाढल्यामुळे पत्नी २०२१मध्ये विभक्त झाली.