नागपूर : मोबाइल आणि लॅपटॉप चोरांच्या आंतरराज्यीय टोळीतील तीन कुख्यात आरोपींना गजाआड करून गुन्हे शाखेच्या युनिट एकने ५७ मोबाइल, ८ लॅपटॉप, एक आयपॅड यासह १६ लाख ८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जगदिशन मासीचिन्न पझानी (वय ३२, रा. टीटी मोटूर, पेरीयापल्लम, गुडीयात्तमलातुल, वेल्लोर, तामिळनाडू), व्यंकटेश शंकर (वय ३५) आणि गोधनधन रंग्गन मुनूस्वामी (वय २२, दोघे रा. टीटी मोटूर, ओत्तारपलीयम, तामिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रोशन राजेश बिदाणी (वय १८, रा. लालवारी एक्सेल बॉइज हॉस्टेल, खामला) यांनी प्रतापनगर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली होती.
या चोरीचा तपास करीत असताना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र गुप्ता, प्रवीण महामुनी, बबन राऊत, विनोद देशमुख, नितीन वासनिक, सुनीत गुजर, सुशांत सोळंके, शरद चांभारे, हेमंत लोणारे, मनोज टेकाम, योगेश सातपुते, सोनू भावरे, योगेश वासनिक, शिवशंकर रोठे, रवी राऊत, नितीन बोपुलकर, योगेश सेलूकर, चंद्रशेखर भारती, रवींद्र खेडेकर आदींनी सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने आरोपींचा शोध घेऊन त्यांना खलाशी लाईन मोहननगर येथून ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून १६ लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह. पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन, सहायक पोलिस आयुक्त सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.