नागपूर : राज्यात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे. पंतप्रधानांसह विविध राज्यांतील मुख्यमंत्री, उद्योगपती, सिने अभिनेते, गायक कलावंत, धर्मगुरू आणि संतमहंतांची या सोहळ्याला उपस्थिती लाभणार आहे. सरकारच्या या शपथविधीच्या सोहळ्यासाठी रामनगरातील एका चहावाल्यालाही आमंत्रण आले आहे. या आमंत्रणाचा त्याला अतिशय आनंद झाला असून, त्याने सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पारीही केली आहे. गोपाळ असे या चहावाल्याचे नाव असून तो देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय चाहता आहे.
शपथविधी सोहळ्याच्या दिवशी निःशुल्क चहा वाटणार
गोपाळने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास निःशुल्क चहा वाटण्याचा निर्णय घेतला होता; पण ध्यानीमनी नसताना त्याला शपथविधीचे निमंत्रण आले. तो शपथविधी सोहळ्याला जाणार असला तरी, सहकाऱ्यांच्या माध्यमातून शपथविधी झाल्यानंतर निःशुल्क चहा वितरण करणार असल्याचे त्याने सांगितले.
प्रसाद महाराज यांना निमंत्रण
अमळनेर (जि. जळगाव) : सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी संत आणि महंत यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे. अमळनेर येथील संत सखाराम महाराज यांचे ११ वे गादीपुरुष प्रसाद महाराज यांनाही शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच उद्धव महाराज कुकुरमुंडेकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
फडणविसांनीही घेतला चहा
गोपाळ बावनकुळे यांनी चहाचा स्टॉल सुरु केल्यापासून त्याच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. गोपाळ याचे दुकान पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात आहे. फडणवीस हे पहिल्यांदा पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडून आले होते.
● तेव्हापासून ते गोपाळला नावाने ओळखतात. अडीच वर्षांपूर्वी फडणवीसांनी त्यांच्या ठेल्यावर चहाही पिला होता. यंदा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोपाळ यांनी पुन्हा त्यांना चहासाठी आमंत्रित केले होते; ; मात्र फडणवीसांना यंदा शक्य झाले नाही.
दोन दिवसांपूर्वी गोपाळ नेहमीप्रमाणे • चहाच्या ठेल्यावर आपले काम करीत असताना, त्याला फडणवीस यांच्या कार्यालयातून फोन आला. त्यांनी गोपाळला शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले.