नागपूर : मेडिकलमधील एमबीबीएसच्या दुसºया वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याने स्वत:ला कोंडून घेतल्याने खळबळ उडाली. मानसोपचार विभागाचे डॉक्टर, सुरक्षा रक्षक व पोलिसांनी वेळीच धावपळ करून त्याला सुखरूप बाहेर काढले. सध्या त्याच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. राजस्थान येथील हा विद्यार्थी अभ्यासात हुशार आहे. त्यामुळेच त्याचा अखिल भारतीय कोटाअंतर्गत नागपूर मेडिकल एमबीबीएससाठी नंबर लागला. एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असल्याने त्याची मानसिक स्थिती खालवल्याने त्याचा वडिलांनी घरी नेऊन जोधपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती केले. तिथे काही दिवस उपचार घेतल्याने ते मुलासोबत नागपुरला आले. मेडिकल जवळील धर्मशाळेत मुलासोबत रहात होते.
बुधवारी अचानक त्याने वडिल बाहेर गेल्याचे पाहून आतून दरवाजा बंद केला. काही वेळाने परत आलेल्या वडिलांनी त्याला दार उघडण्यास सांगितले. पण तो ऐकत नव्हता. त्याच्या वडिलांनी तातडीने मेडिकलच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मेडिकलच्या मानसोपचार विभागाने सुरक्षा रक्षकासह एका सहायक प्राध्यापकाला खोलीवर पाठविले. पोलिसांनाही सूचना देण्यात आली. अखेर पोलिसांनी खोलीचे दार उघडून विद्यार्थ्याला बाहेर काढले. मानसोपचार विभागातील वॉर्डात त्याला भरती केले.
विद्यार्थ्याला ‘मूड डिसऑर्डर’ मानसोपचार विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले, या विद्यार्थ्याला ‘मूड डिसऑर्डर’ हा विकार आहे. ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे, जी प्रामुख्याने आपल्या भावनिक स्थितीवर परिणाम करते. हा एक असा विकार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप आनंद, आत्यंतिक दु:ख किंवा दोन्हीचा दीर्घकाळ अनुभव येतो. या विद्यार्थ्यावर नोव्हेंबर २०२३ पासून उपचार सुरू होते. जानेवारी महिन्यापासून त्याने ही औषधी स्वत:हून बंद केली. तेव्हापासून त्यांच्यात लक्षणे दिसून येत होती. परंतु आता लक्षणे वाढल्याने त्याने स्वत:ला कोंडून घेतले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.